आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरात कारंजे बंद, शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील कारंज्याचे नोझल चोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नयनरम्य कारंजे बसवण्यात आले होते. 15 ऑगस्टला सुरू झालेले कारंजे महिनाभरही व्यवस्थित चालले नाही. पुतळ्याच्या परिसरात सुरक्षेसाठी दोन कर्मचारी नियुक्त करूनही कारंजाचे पितळी नोझल चोरी झाल्याने पुतळ्यांच्या सुरक्षेसंदर्भातही प्रo्नचिन्ह निर्माण झाले आहे. नोझल चोरीनंतर दोन्ही कर्मचार्‍यांची नोकरी अडचणीत येऊ नये, यासाठी प्रकरणाची वाच्यता केली जात नसल्याची स्थिती आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहरातील राष्ट्रीय पुरुषांच्या पुतळे सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर असलेली हिरवळ काढून टाकत त्या ठिकाणी आठ लाख रुपये खर्च करत रंगीत कारंजे बसवण्याचे काम सहा महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले होते. पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात कारंजे बसवण्याचे काम पूूर्ण झाले होते. 15 ऑगस्टपासून कारंजे नियमित सुरू करण्यात आले होते. महिना पूर्ण होण्याआधीच 12 सप्टेंबरला कारंजांसाठी लावलेली पितळी नोझल चोरीस गेल्याची बाब निदर्शनास आली. 24 पैकी आठ नोझल चोरी गेल्याने सद्या सर्वच कारंजे बंद आहेत.

शहरातील प्रमुख पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेतर्फे कर्मचारी नियुक्त केले जातात. शिवाजी महाराज पुतळ परिसरात देखील दोन कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. कर्मचार्‍यांची नियुक्ती केलेली असतानाही चोरी झालीच कशी, असा प्रo्न उपस्थित होत आहे. कर्मचारी खरोखर या ठिकाणी लक्ष ठेवून असते तर चोरी झालीच नसती. चोरीच्या घटनेनंतर दोघांचीही नोकरी अडचणीत येणार असल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांकडून प्रकरणासंदर्भात प्रचंड गोपनीयता बाळगली जात आहे.


आठ लाख झाला खर्च

कारंजे उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी पुतळ्यासाठी आठ लाखांचा निधी मंजूर झाला होता. तीन लाख रुपये खचरून कारंजांसाठी पाण्याची मोठी टाकी जमिनीत बांधण्यात आली होती. तर कारंजांसाठी चार लाख 76 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.

इतर पुतळ्यांच्या सुरक्षेचे काय ?

शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, राणी लक्ष्मीबाई, अण्णाभाऊ साठे, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत. या पुतळ्यांच्या सुशोभिकरणासाठी पालिकेतर्फे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र कधीही संबंधित कर्मचारी पुतळ्यांजवळ किंवा परिसरात निदर्शनास येत नाहीत.

भुरट्या चोरांचा पालिकेतही उच्छाद

पालिकेच्या सर्व मजल्यांवर स्वच्छतागृहे आहेत. ठरावीक मजले सोडले तर इतर मजल्यांवरील नळांच्या पितळी व स्टीलच्या तोट्या चोरून नेल्या आहेत. आग प्रतिरोधक यंत्रणेसाठी ठेवलेले पाईप व पितळाचे मोठे नोझलही चोरून नेले आहेत. हीच परिस्थिती पालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलांमधील स्वच्छतागृहांची आहे.