आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षतोड रोखण्यासाठी झाडांना दिले नंबर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मेहरूण तलावाच्या चौपाटीवर असलेल्या दोन हजार वृक्षांच्या संरक्षणासाठी शहरातील भरारी फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. वृक्षतोडीला आळा बसावा, वाळवीपासून संरक्षण व्हावे या दृष्टीने वृक्षांना रंगरंगोटी केली जात आहे. रंगरंगोटी झाल्यावर प्रत्येक वृक्षाला क्रमांक देण्याचे काम संस्थेकडून केले जाणार आहे.

शहरातील सौंदर्यात भर घालण्यासह पाण्याची पातळी वाढविण्यास मदत करणार्‍या मेहरूण तलावाकाठी सुमारे दोन हजार वृक्ष आहेत. तलावाच्या चौपाटीवरील दोन्ही बाजूला बाभूळ, लिंब, सिसम, गुलमोहरसह अन्य प्रकारातील मोठमोठे वृक्ष आहेत. वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी पालिकेची असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

काही वृक्षांना वाळवी लागत आहे. कमकुवत झाल्यावर वृक्ष तोडून नेण्याचे प्रकार लक्षात आल्याने भरारी फाउंडेशनतर्फे याला आळा घालण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याचे ठरवले आहे. या कामासाठी भरारी फाउंडेशनचे कार्यकर्ते अजय रंधे, अमेय जोशी, प्रवीण चव्हाण, स्वप्निल पाटील, धनंजय पाटील, अमोल पाटील हे दिवसातील दोन तास वेळ देत आहेत. चौपाटीलगत असलेल्या वृक्षांना रंगरंगोटी करण्यात येत असून यानंतर प्रत्येक वृक्षाला क्रमांक देण्यात येत आहे.

गेरू, चुना, थायमेटचा वापर
वृक्षाला कीड लागू नये यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जात आहे. वृक्षाच्या मुळालगत गेरूचा लेप तर त्याच्यावर चुना लावला जात आहे. वाळवी लागू नये यासाठी थायमेटसारखे कीटकनाशक मारले जात आहे. काम करण्यासाठी मजूर नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांकडून सक्रिय मदत केली जाते.

दररोज दोन तास काम
पर्यावरण संरक्षणासाठी संघटनेशी जुळलेले विद्यार्थी दिवसातील दोन तास वेळ या कामासाठी देत आहेत. रंगरंगोटीच्या साहित्यासाठी जळगाव पीपल्स बँकेचे सहकार्य मिळत आहे. या ठिकाणचे काम झाल्यावर शहरातील इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वृक्षांच्या संवर्धनासंदर्भातही योगदान देण्याची तयारी आहे. दीपक परदेशी, अध्यक्ष, भरारी फाउंडेशन