आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यसेविकेला सापडली वाड्मय निर्मितीची ‘नस’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- वडील ओव्या अन् भारदस्त लावण्या रचायचे. श्रीमद् भागवत गीता, पुराणांचे पारायणही करायचे. लिखाणाचे बाळकडू मला त्यांच्याकडून मिळाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लिहिलेली एक चारोळी त्यांना दाखवली. ती वाचल्यानंतर त्यांनी अतिशय प्रसन्न मुद्रेने पाठीवर शाबासकीची थाप मारली अन् 1962 सालापासून वाड्मयनिर्मितीचा वसा घेतला, हे बोल आहेत साहित्यिक विमल सुरवाडकर यांचे.

धरणगाव तालुक्यातील पाळधी आरोग्य उपकेंद्रातून त्या आरोग्यसेविका म्हणून अलीकडेच सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन रविवारी भुसावळात होत आहे. या निमित्ताने त्यांनी ‘दिव्य मराठी’शी खास संवाद साधला. त्या म्हणाल्या की, आरोग्य विभागात सेवाव्रतावर नितांत निष्ठा ठेवली. जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा नामवंत लेखकांचे साहित्य वाचून काढले. मधुमक्षिकावृत्तीचे परिपालन करून त्यातून डोळसपणे ज्ञानकण वेचले. शब्दभांडार बर्‍यापैकी वाढल्याची खात्री झाल्यावर मग खर्‍या अर्थाने लिहिलेल्या आशयघन असा ‘भावपिसारा’ काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचे धाडस केले. वाचकांनी या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहाचे पत्राद्वारे भावभावना मांडून कौतुक केले. तेव्हापासूनच आणखी ताकदीने लिहिण्याचे बळ अंगात संचारले. वर्षभरानंतर ‘स्पर्श बावरी’, ‘अधीर मी सुधीर तू’ हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित केले. त्यानंतर आता एकाचवेळी ‘पैकी प्रेम कुणाचे?’ (व्यक्तिचित्रण), ‘झुलते कवडसे’, ‘जगणे कुणासवे ना!’, ‘अनुभवाचे बोल’ या कादंबर्‍या आणि ‘अबोली बोलते अंतरी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होत आहे. आरोग्य सेविका म्हणून तब्बल तीन दशकात समाजजीवनात वावरताना जे सुख, दु:खाचे अनुभव आले ते आता शब्दबद्ध करण्यात गुंतले आहे. एकाचवेळी पाच पुस्तकांचे प्रकाशन होत असल्याने हा क्षण माझ्यासाठी आकाशाला गवसणी घालणारा आहे, असेही त्या आवर्जून सांगतात. विमल सुरवाडकर यांचा पिंड आरोग्य सेवेचा असला तरी त्यांचे शब्दसार्मथ्य प्रचंड आहे. वाड्मयनिर्मितीची अतिशय सुक्ष्म नस त्यांना सापडली आहे, हे त्यांची आठही पुस्तके वाचल्यावर सहज लक्षात येते. त्यांच्या ‘झुलती कवडसे’, ’जगणे कुणासवे ना!’ या दोन्ही कादंबर्‍या समाजजीवनाचे वास्तववादी चित्रण मांडणार्‍या तर आहेतच; पण त्यांनी त्याला ठराविक प्रसंगांचे महत्त्व पटवून देण्यासाठी पद्याची लखलखती किनार जोडली आहे. म्हणूनच या कादंबर्‍या वाचकांना अंतर्मुख करून खिळवून ठेवतात. त्यांच्या कवितेतील प्रत्येक ओळ ही प्रभावी संदेश देणारी आहे.

‘अनुभवाचे बोल’ संवादी प्रेमसंकिर्तन
सुरवाडकरांचे ‘अनुभवाचे बोल’ हे पुस्तक प्रेमाचे पावित्र्य किती आल्हाददायक, सुक्ष्मातिसुक्ष्म असते हे चिकित्सकपणे मांडणारे आहे. त्याला निरीक्षणाचे मानसशास्त्रीयदृष्ट्या संयत भाषेत केलेले संवादी प्रेमसंकिर्तनच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

‘अबोली बोलते अंतरी’ या काव्यसंग्रहातील ‘बंद केली ती जिव्हा तू ओठही शिवलेत माझे, अलवार मम त्या भावनांचे जाहले मज आज ओझे’, ‘विहरतो नभात पाखरांचा हा थवा, शोधतो तुला मनातला हा पारवा’ अशा नानाविध कविता त्यांच्या अंतर्मनातील भावभावनांना वाट मोकळी करून देणार्‍या आहेत.

स्नेहीजनांनी उचलला ‘आर्थिक’ भार
आरोग्यसेविका सुरवाडकर यांची आर्थिक परिस्थिती तशी मध्यम आहे. त्यामुळे त्यांच्या नव्याने प्रकाशित होत असलेल्या दोन पुस्तकांच्या प्रकाशनाचा आर्थिक भार मुंबई येथील आरबीआयचे सेवानिवृत्त व्यवस्थापक विजय डी. सुरवाडेंनी तर एका पुस्तकाचा भार भुसावळच्या ‘मैफल’ प्रकाशनचे काशिनाथ भारंबे यांनी उचलला आहे. लेखक-लेखिकेच्या लेखणीतून प्रसवलेले साहित्य हे दर्जेदार असेल तर ते समाजासमोर आणण्यासाठी पदरमोड करणारेही असतात, असा संदेश या माध्यमातून झिरपणार आहे.