आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nursery, Kindergarten Admissions Process, But In January, April May In The Meantime

नर्सरी, बालवाडी प्रवेश प्रक्रिया जानेवारीत नव्हे एप्रिल-मेमध्येच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पूर्व प्राथमिक व प्राथमिक प्रवेशासंदर्भातील संस्थांच्या मनमानी कारभाराला प्राथमिक शिक्षण संचालनालयाने लगाम लावला आहे. 2014-15 या शैक्षणिक वर्षासाठी दिल्या जाणार्‍या प्रवेशाची प्रक्रिया डिसेंबर-जानेवारीत न घेता एप्रिल- मेमध्ये पूर्ण करण्याचा फतवा काढला आहे.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढता कल लक्षात घेता या संस्थाचालकांनी नर्सरी, ज्युनिअर केजी या वर्गाच्या प्रवेशाकरिता अनेक संस्थांमध्ये डिसेंबर-जानेवारीतच प्रक्रिया राबविण्याचे प्रकार अलीकडे फोफावले आहे. परिणामी, अनेक पालकांना याची माहिती नसल्यामुळे ऐनवेळी त्यांना हव्या असलेल्या शाळेत प्रवेश मिळत नाही. यासंदर्भात संस्थांकडून मनमानीपणे प्रवेशाची प्रक्रिया घेतली जात होती. प्रत्येक शाळेतील प्रवेशाबाबतचे निकष आणि प्रक्रियेच्या तारखा वेगवेगळ्या असल्यामुळे पालकांचा प्रचंड गोंधळ उडतो. यावर अंकुश घालण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने एकाचवेळी म्हणजे एप्रिल व मे महिन्यातच प्रवेशाची प्रक्रिया राबविण्याचे लेखी आदेश शिक्षण संचालक महावीर माने यांनी काढले आहेत.

सेंट टेरेसात प्रक्रिया पूर्ण

शहरातील टॉप संस्थांमध्ये डिसेंबर-जानेवारीलाच प्रवेशाच्या हालचाली केल्या जातात. त्यानुसार सेंट टेरेसामध्ये ऑनलाइन प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांची यादी सूचना फलकावर जाहीर करण्यात आली आहे. मात्र, इतर संस्थांनी संचालक मंडळाची बैठक न झाल्यामुळे प्रक्रिया थांबवून ठेवली होती. त्यातच शासनाचे आदेश आल्याने आता ती तीन महिने लांबणीवर पडली आहे.

25 टक्के आरक्षण प्रवेश ऑनलाइन

प्राथमिक व पूर्व प्राथमिकची प्रवेशप्रक्रिया केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन राबविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यासंदर्भात एप्रिलपूर्वी शासनस्तरावरून तशा सूचना दिल्या जातील. मात्र, मोफत सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार 25 टक्केआरक्षणांतर्गत प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन राबविली जाणार आहे. त्याबाबतचे वेळापत्रकदेखील शिक्षण संचालनालयाकडून जाहीर केले जाणार आहे.
मुख्यध्यापकांच्या बैठकीत दिले आदेश

प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शिक्षण विभागाला याबाबतचे लेखी आदेश दिले आहेत. त्यानुसार नुकत्याच झालेल्या विनाअनुदानित आणि अनुदानित संस्थांच्या मुख्याध्यापकांच्या सभेत याची माहिती देण्यात आली आहे. तसेच 25 टक्के आरक्षण प्रवेश शासनाच्या नियोजनानुसारच पूर्ण करण्याच्याही सूचना दिल्या आहेत, असे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी सांगितले.

पालकांची गैरसोय टाळण्यासाठी घेतला निर्णय

प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना धावपळ करावी लागते. प्रवेशाबाबतच्या संस्थांच्या वेगवेगळ्या धोरणामुळे पालकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एकाचवेळी म्हणजे एप्रिल-मे मध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी काढले आहेत. त्यानुसार कार्यवाही पूर्ण केली जाईल. शिवाजी पाटील, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग