आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी सुरक्षारक्षक पुन्हा धुळे मनपाच्या ड्यूटीवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - बनावट पावती आढळल्यानंतर चितोड रोड जकात नाक्यावरील सुरक्षारक्षक दिलीप थोरात याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटकही झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर तोच सुरक्षारक्षक कामावर असल्याचे बुधवारी शिवसेना नगरसेवकांना आढळून आले. त्यामुळे जकातीतील गैरव्यवहाराला अधिकार्‍यांचाच पाठिंबा असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला आहे.

महापालिका प्रशासन गेल्या काही दिवसांपासून जकात वसुली करीत आहे. शहरांतर्गत 22 जकात नाके आहेत. त्यावर 140 कर्मचारी नियुक्त केले आहेत. मात्र, अद्यापही जकात नाक्यांवर जकातचोरी सुरूच आहे. अनेक स्थानिक वाहनांना कमी पैसे घेऊन विनापावती सोडले जात असल्याचे प्रकार नाक्यावर भेट दिली असता पाहायला मिळाले. नाक्यावर बनावट पावत्या दिल्या जात असल्याचा आरोप सर्वप्रथम स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक संजय जाधव यांनी केला होता. दरम्यान चितोड रोड नाक्यावर एका ट्रकचालकाकडे बनावट पावती सापडली होती. त्याप्रकरणी चितोड नाक्यावरील कर्मचारी आणि सुरक्षारक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता ; परंतु बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शिवसेनेच्या नगरसेवकांनी चितोड रोड नाक्यावर अचानक भेट दिली असता, तेथे गुन्हा दाखल झालेला आणि जामिनावर सुटका झालेला सुरक्षारक्षक कामावर असल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला.

या कर्मचार्‍याला जकात विभागातील लिपिकानेच नियुक्त केल्याचे या वेळी नगरसेवकांनी घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातून जकात विभागातील गलथानपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या कर्मचार्‍याला कुणाच्या आदेशाने पुन्हा कामावर घेण्यात आले हा संशोधनाचा विषय आहे. बनावट पावतीचा विषय एवढा गाजत असताना अधिकार्‍यांनी दक्ष असणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे विभागातील कर्मचार्‍यांवर कोणाचाही वचक नसल्याचे या घटनेने दिसून येत आहे. चितोड रोड नाक्यावर भेट दिली त्या वेळी अतुल सोनवणे, संजय जाधव, महेश मिस्तरी, संजय गुजराथी, प्रशांत र्शीखंडे, नरेंद्र परदेशी आदी उपस्थित होते.


मनपानेही माहिती घ्यावी
महापालिकेच्या अधिकार्‍यांनीही जकात नाक्यावर कुणाची ड्यूटी लावली आहे, याबाबत रोजच्या रोज माहिती घेतली पाहिजे. तसेच अचानकपणे नाक्यांना भेट देऊन त्याची खातरजमा करणे गरजेचे आहे. तसेच सुरक्षारक्षकांच्या ड्यूटीचीही माहिती जकात विभागाला देणे गरजेचे आहे.


डॉ.पठारेंकडे विचारपूस
बनावट पारगमन पावतीप्रकरणी धुळे शहर पोलिसांनी बुधवारी उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्याकडे विचारपूस केली. महापालिकेने पावती पुस्तक छपाईचा ठेका कोणाला दिला आहे?, त्यांची छपाई कोठे होते?, त्याची निविदा कधी काढण्यात आली होती? अशा स्वरूपाचे प्रश्न त्यांना विचारण्यात आले, अशी माहिती पोलिस निरीक्षक दीपक कोळी यांनी दिली आहे.

‘त्या’ सुरक्षारक्षकाला परस्पर ड्यूटी कार्ड
चितोड रोड नाक्यावर रात्रीच्या ड्यूटीला असलेल्या सुरक्षारक्षकाने दिलीप थोरात यांना ड्यूटीचे कार्ड देऊन कामावर उपस्थित राहायला सांगितले, असे दिलीप थोरात यांनी सुरक्षा एजन्सीकडे लेखी दिल्याची माहिती उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी दिली. तर सुरक्षा एजन्सीकडून सदर कर्मचार्‍याला काढून टाकल्याचे सांगण्यात आले आहे. सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याचे काम एजन्सीचे आहे. मात्र, तक्रार आणि गुन्हे दाखल असलेले कर्मचारी ठेवू नयेत, असा नियम असताना परस्पर कसे कामावर आले याची एजन्सीकडून माहिती घेण्यात येईल. डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त,महापालिका