आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानगरपालिका निवडणूक आचारसंहितेच्या पालनासाठी अधिकारी नियुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने राजकीय पक्षांची फलक झाकण्याची लगबग सुरू झाली आहे. प्रचाराचे ध्वज, चिन्हे आदी असलेल्या जाहिरातींचे फलक काढण्याच्या कामाला राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. तसेच आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून सहायक आयुक्त दर्जाचा अधिकारी लक्ष ठेवून आहे.

पालिकेच्या तिसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला. कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सोमवारी सर्व पक्षांच्या महानगरप्रमुखांना आचारसंहिता पालनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन करत मंगळवारी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शहरात लावलेले शाखा फलकंसह अन्य फलकांना झाकणे सुरू केले. फलक झाकण्यासंदर्भात पुन्हा एकदा सूचना देण्यात आल्यावर पुढील आठवड्यात थेट तपासणी करण्यात येणार आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी संबंधित पक्ष अथवा उमेदवारावर कारवाई होऊ शकते.

मुलाखतींसाठी लागेल पूर्वपरवानगी
आचारसंहितेच्या काळात स्थानिक केबल नेटवर्क व वाहिन्यांवरून राजकीय मुलाखती किंवा अन्य कार्यक्रम प्रसारित करता येणार नाहीत. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. असे कार्यक्रम करायचे झाल्यास सर्व पक्ष व उमेदवारांना समान संधी मिळेल, याची खात्री संबंधित निवडणूक अधिकार्‍याने करणे आवश्यक असल्याचे सहायक निवडणूक आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी म्हटले आहे.


सहायक आयुक्तांसह अधिकार्‍यांचा ताफा
शहरात आचारसंहितेचे पालन होत आहे किंवा नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेचे सहायक आयुक्त पी.डी.सोनवणे यांच्यासह तीन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे अधिकारी उपजिल्हाधिकारी दर्जाचे असतील. तसेच त्यांच्या मदतीला आणखी सहा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असून, तेही तहसीलदार दर्जाचे असतील. त्याचप्रमाणे या अधिकार्‍यांच्या मदतीसाठी पालिकेतील सहा अधिकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. पालिकेच्या सहाव्या मजल्यावर सहायक आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्याची सुविधा आहे.