आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Officers, Speaking Lie Issue At Jalgaon, Divya Marathi

अधिकारी खोटे बोलून टोप्या घालतात!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनाच्या नावाने चार तास चाललेला काथ्याकुट केवळ राजकीय आणि प्रशासकीय विरंगुळा ठरला. यंत्रणेतील मुजोर अधिकारी कामे न करताच खोटी माहिती, आकडेवारी सादर करून टोप्या घालत असतील तर ‘अच्छे दिन कसे येणार,’ या प्रश्नाने कासाविस झालेले लोकप्रतिनिधी बैठकीत भरकटले. नव्या नियोजनाऐवजी जुने इतिवृत्त आणि दुखण्यांवर रेघोट्या ओढल्याने जिल्हावासीयांसाठी ही बैठक केवळ वांझोटीच ठरली.
जिल्हा नियोजन समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. प्रशासनाने 100 टक्के निधी वितरित झाल्याचा दावा केला असला तरी निधी पडून असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी नियोजनाच्या बैठकीत केला. आमदार साहेबराव पाटील, अशोक कांडेलकर यांनी आग्रहीपणे तो सिद्धही करून दाखवला. तो मुद्दा गांभीर्याने घेण्याऐवजी बैठकीची औपचारिकता पूर्ण करताना उणीदुणी काढण्यात बैठक रंगली. नव्या वर्षाच्या नियोजनावर केवळ अर्धा तासच चर्चा होऊ शकली. सभागृहाच्या आग्रहास्तव पालकमंत्र्यांनी सर्वच विभागांना जूनअखेरपर्यंत विकासकामांच्या वर्क ऑर्डर काढण्याचे आदेश दिले. लोकप्रतिनिधींचे आरोप आणि अधिकार्‍यांनी लावलेल्या शेंड्या आजच्या बैठकीचे वैशिष्ट्ये ठरले.

‘अच्छे दिन’ येण्यास नोकरशहांचा अडसर
आपल्याकडे इच्छा असूनही ‘अच्छे दिन’ येत नाहीत. अधिकारी त्यांची शासकीय कार्यशैली सोडायला तयार नाहीत. गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे वेळेत काम करण्याची प्रवृत्ती नसल्याने अधिकारीवर्गाकडून फारसे सहकार्य मिळत नसल्याची खंत पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. बैठकीत वारंवार ‘अच्छे दिन’ या शब्दाचा उच्चार करणार्‍या साहेबराव पाटलांसह अनेकांनी अच्छे दिन येण्यासाठी नोकरशहा अडसर असल्याचे मत व्यक्त केले. दिलरूबाब तडवी यांनी तर अच्छे दिन येऊ नये,यासाठी अधिकार्‍यांनी सुपारी घेतल्याचा आरोपच केला. नियोजन अधिकारी नि.शा.राणे यांच्यावर त्यांनी आगपाखड केली.

अखर्चित निधीचे पितळ उघडे
जिल्ह्यात अनेक ठिकाणी विकासकामे पूर्ण झाली आहेत. परंतु या कामांची बिले निघाली नाही. तर दुसरीकडे पैसे पडून आहेत. परंतु कामे होत नाहीत. या दोन्ही प्रकारामुळे विकासकामे होत नसून यासाठी अधिकार्‍यांची दिरंगाई जबाबदार आहे. नियोजन समितीच्या बैठकीत उघड झालेल्या आकडेवारीत अखर्चित निधीचे पितळ उघडे पडले.

प्रमुख पदाधिकारी, अधिकार्‍यांची पाठ
जिल्ह्यातील तिन्ही खासदार, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, गिरीश महाजन, जगदीश वळवी, पोलिस अधीक्षक एस.जयकुमार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगलेसह बहुतांश विभागांचे अधिकारी बैठकीला गैरहजर होते.

किमान जनतेशी सौजन्याने वागा
अधिकार्‍यांना प्रश्न सोडवता येत नसतील तर त्यांनी किमान जनतेशी सौजन्याने वागले पाहिजे. अनेक बेकायदेशीर कामे होत आहेत. नागरिकांचा संपात वाढत आहे. अधिकारी सुधारणा करत नसतील तर राजकारण गेले खड्डय़ात मी आंदोलन उभारेल, असे आव्हान आमदार शिरीष चौधरींनी दिले. उमेश नेमाडेंनी भुसावळच्या वीजपुरवठय़ासंदर्भात महावितरणला धारेवर धरले. अँड.रवींद्र पाटील यांनी अखर्चित निधीवर निर्णय घेण्याची मागणी केली. तसेच पंतप्रधान झाल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव आमदार चिमणराव पाटलांनी मांडला. साहेबराव पाटलांनी त्याला अनुमोदन दिले. त्यावर आता अच्छे दिन आले आहेत, असे म्हणत पालकमंत्र्यांनीही मोदी सरकारला शुभेच्छा व्यक्त केल्या.