आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात‍ सव्वाशे वर्षांपूर्वीची चावडी जमीनदोस्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जुन्या जळगावातील तीन पिढय़ांचा संपर्क, गावाचे प्रवेशद्वार तसेच तंटे सोडवण्याचे ठिकाण अशा अनेक बाबींसाठी भावनात्मक नाते जुळलेल्या व कायमस्वरूपी स्मरणात राहणारी सव्वाशे वर्षांच्या इतिहासाची साक्षीदार असलेली जळगावकरांची चावडी रविवारी जमीनदोस्त झाली. बांधकाम पडके झाल्याने पाडण्यात आलेल्या तलाठी कार्यालयाला येत्या तीन महिन्यात लोकसहभागातून नवीन रूप देण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

जळगाव गावात प्रवेश करण्यापूर्वी येणार्‍या प्रत्येकाला चावडी गाठावी लागत असे. महसुली कामे असतील की आपसातील वाद त्याचा निवाडा करण्याचे ठिकाण असलेल्या ‘मुलकी चावडी’ जुन्या जळगावातीलच नव्हे तर जळगावकरांच्या तोंडी असलेले नाव. जळगाव शहरातील जुन्या वास्तुंपैकी एक असलेल्या तलाठी कार्यालयाचे बांधकाम रविवारी सकाळपासून पाडण्याचे सुरू होते.

पडाऊ झाल्याने घेतला निर्णय
सव्वाशे वर्षांचा इतिहासाची साक्षीदार असलेल्या मुलकी चावडीत तलाठी कार्यालय व मंडळ कार्यालय होते. या जागेचे बांधकाम माती व विटांचे होते. काही महिन्यांपासून छताचे लाकडी खांब (सरे) उधई लागल्याने कोसळू लागले होते. तसेच पाट्याही निघत होत्या. दिवसभर माती पडणे सुरूच होते. पावसाळ्यात पाणी गळत असल्याने महत्त्वाचे दस्तऐवज ओले होण्याचे प्रमाण वाढण्याची भीती असल्याने बर्‍याच वर्षांचा सहवास असलेली चावडी पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.