आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: रेल्वेत चढताना महिला रुळाजवळ कपारीत पडली; गाडी पुढे-मागे करून काढले बाहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ-नाशिकराेड पॅसेंजरच्या खाली पडलेल्या जखमी सुमनबाई जाधव यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन जाताना पाेलिस कर्मचारी प्रवासी - Divya Marathi
भुसावळ-नाशिकराेड पॅसेंजरच्या खाली पडलेल्या जखमी सुमनबाई जाधव यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन जाताना पाेलिस कर्मचारी प्रवासी
जळगाव - भुसावळ-नाशिकपॅसेंजर गाडीत चढताना एका वृद्ध प्रवासी महिलेचा पाय घसरल्याने ती थेट डब्याच्या खाली रुळाजवळील कपारीत पडली. कपारीत पडल्यानंतर इकडे गाडीचा हाॅर्न वाजला. गाडीने हळूहळू वेग घेतला. मात्र, गाडीत बसलेले अप-डाऊन करणारे विद्यार्थी, इतर प्रवाशांनी तत्काळ साखळी ओढून गाडी थांबवली. महिला रुळाखाली पडल्याचे पाहून अनेकांचा श्वास रोखला गेला होता. अखेर गाडी पुढे-मागे करून महिलेस कपारीतून बाहेर काढण्यात यश मिळाले. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेने १५ मिनिटांत अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. परंंतु प्रवाशांची तत्परता आणि महिलेचे नशीब बलवत्तर असल्याने ती मृत्यूच्या दाढेतून अलगद बाहेर आली. गुरुवारी सायंकाळी वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर घडली. सुमनबाई जाधव असे या नशीबवान महिलेचे नाव अाहे.

 

बाेढरा (ता.चाळीसगाव) सुमनबाई रोहिदास जाधव (वय ६०) ह्या पती रोहिदास जाधव मुलगा पूनमचंद यांच्यासोबत गुरुवारी सकाळी जळगाव न्यायालयात खटल्याच्या कामासाठी आल्या होत्या. न्यायालयात दिवसभर कामकाज केल्यानंतर जाधव कुटुंबीय सायंकाळी 6 वाजता भुसावळ-नाशिक पॅसेंजरने बाेढरा येथे जाण्यास जळगाव रेल्वेस्थाकावर अाले. पॅसेंजर असल्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी हाेती. गाडी अाल्यानंतर सुमनबाई यांना डब्यात प्रवेश मिळवण्यासाठी दमछाक करावी लागली. गर्दीतून वाट काढत सुमनबाई यांनी दरवाजा गाठला. डब्यात शिरत असताना त्यांचा एक पाय घसरला. त्यामुळे त्या थेट प्लॅटफार्मच्या कपारीतून खाली रुळावर कोसळल्या. ही घटना पाहून अनेकांचा थरकाप उडाल्याने प्लॅटफॉर्मवर गोंधळ उडाला. त्याचवेळी गाडीदेखील सुरू झाली. सुमनबाई रेल्वेच्या चाकाखाली येतील या विचाारानेच अनेक प्रवाशांची भंबेरी उडाली. अनेकांनी भीतीपोटी डोळे मिटले. परंतु सुमनबाई यांचे नशीब बलवत्तर होते. त्यामुळे त्या रुळाजवळ असलेल्या खोलगट भागात अडकून पडल्यामुळे रेल्वेचे चाक किंवा कोणत्याच भागाचा त्यांना स्पर्श झाला नाही. गाडी सुरू झाल्यानंतर सहप्रवाशांनी तत्काळ साखळी ओढल्यामुळे काही फूट पुढे गेलेली रेल्वेगाडी लागलीच थांबली. त्यानंतर सुमनबाई यांना बाहेर काढून त्यांना सिव्हिलमध्ये दाखल केले. अपघातात सुमनबाईच्या उजव्या पायाला दुखापत झाली अाहे.

 

रुग्णवाहिकेसाठी १५ मिनिटे : जखमी सुमनबाईंना लिफ्टमधून स्थानकाच्या बाहेर आणण्यात आले होते. परंतु बाहेर रुग्णवाहिकाच उपलब्ध नव्हती. काही नागरिकांनी रुग्णवाहिकेसाठी फोन केले. त्यानंतर २० मिनिटांनी रुग्णवाहिका उपलब्ध झाली होती.

 

मदती एेवजी तरुणाइची माेबाईलवर चित्रणासाठी धडपड
सुमनबाई ह्या गाडीखाली अडकलेल्या असताना त्यांना मदतीचा हात देण्याएेवजी काही तरूण मोबाइलमध्ये त्यांचे फोटो, व्हिडिओ चित्रण करण्यास धडपड करीत हाेते. पोलिसांनी त्या मुलांना हटकल्यानंतर त्यांनी मोबाइल बंद केले; पण ही घटना काही सेकंदातच व्हायरल झाली होती. त्यामुळे सुमनबाई यांचे नातेवाईक, ओळखीचे लोक कुटंुबीयांना वारंवार फोन करून माहिती विचारत होते. मात्र, उपचार झाल्यानंतर आपण सुखरूप आहोत, अशी सुमनबाई यांची प्रतिक्रिया एका सुज्ञ नागरिकाने रेकॉर्ड करुन काही ग्रुपवर टाकली. त्यामुळे नातेवाइकांंनी सुटकेचा नि:श्वास साेडला.


अप-डाऊन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सजगता ठेवून वृद्धेला काढले बाहेर
पॅसेंजरगाडीत मुंबईच्या लोकल ट्रेन प्रमाणे अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांची गर्दी असते. गुरुवारीदेखील नेहमीप्रमाणे संपूर्ण गाडीत गर्दीच होती. परंतु या गर्दीतही एकमेकांना आधार देणारे प्रवासीदेखील असतात. गुरुवारीदेखील नेहमीप्रमाणे संपूर्ण रेल्वेगाडी प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. यातच सुमनबाई रुळावर पडल्यानंतर चांगलाच गोंधळ उडला होता. परंतु अप-डाऊन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सजगता दाखवत तत्काळ साखळी ओढली. त्यामुळे रेल्वेगाडी थांबली होती. यानंतर सुमनबाईंना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्या रुळाजवळील एका खोलगट भागात पडलेल्या असल्यामुळे बाहेर काढणे कठीण होते. त्यासाठी रेल्वेगार्ड, स्टेशन मास्तर, लोहमार्ग पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ घटनास्थळ गाठले. अखेर गाडी मागे-पुढे करून थोडी मोकळी जागा दिसल्यानंतर सुमनबाई यांना अलगदपणे बाहेर काढले. खाली पडल्यामुळे त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीजवळ दुखापत झाली होती. त्यांना बाहेर काढण्यासाठी १५ मिनिटे प्रयत्न करावे लागले.


 

बातम्या आणखी आहेत...