धुळे - शहरात मंगळवारी मध्यरात्री तीन तास झालेल्या पावसाने एकच दाणादाण उडवली. यात बसस्थानका समोरील झाड कोसळले. त्याचबरोबर आग्रारोडवर रणसिंग चौकात विजेच्या धक्क्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे जवळपास सहा तास वीजपुरवठा खंडित झाला होता.
परतीच्या पावसाने शहराला मंगळवारी मध्यरात्री झोडपून काढले. पहिल्यांदाच दमदार पाऊस झाल्याचे दिसून आले. या पावसामुळे परिसरात अाल्हाददायक वातावरण निर्माण झाले. रात्री वाजता सुरू झालेला पाऊस पहाटे वाजेपर्यंत मुसळधार स्वरूपात कोसळत होता. त्यानंतर सकाळी सात वाजेपर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. त्यामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले. धुळे तालुक्यातही पाऊस झाला. मात्र, पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाल्याचे दिसून आले नाही. बुधवारीही दिवसभर पावसाचे वातावरण होते.
बसस्थानका समोरील झाड पडल्यामुळे बसेस निघायलाही अडचण येत हाेती.
सरासरी खालावली
शहर परिसरात दमदार पाऊस झाला. मात्र, जलसाठ्यांमध्ये पाणी साठले नाही. गतवर्षाच्या तुलनेत पावसाची सरासरी खालावली आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे संकटही उभे ठाकले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही त्याचा उपयोग होताना दिसत नाही. गतवर्षी याच काळात ९२.८४ इतकी पावसाची सरासरी टक्केवारी होती. यंदा मात्र ती अद्याप ५२.११ इतकीच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.