आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई होताच तलाठी खानने लाचेची रक्कम फेकली गटारीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वीट भट्ट्यांनाना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तलाठी फिरोज खान याला बुधवारी सायंकाळी ५.१० वाजता १८०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्यावर त्याने खुर्चीतून उठून मागच्या दरवाजाने पळ काढून लाचेची रक्कम गटारीत फेकली. तो पळून जात असतानाच बाहेरच्या बाजूने उभे असलेल्या एसीबीच्या १० ते १२ कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. 


एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाल ठाकूर, श्याम पाटील, मनोज जोशी, सुनील पाटील, सुनील शिरसाठ, नासीर देशमुख, प्रवीण पाटील, अरुुण पाटील, प्रशांत ठाकूर, ईश्वर धनगर यांच्या पथकाने ही कारवाई केली. अटक केल्यानंतर त्याला एसीबीच्या कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 


अर्ज भरताच थेट प्रमाणपत्र 
ममुराबाद परिसरातील ११ वीटभट्टीचालक महिनाभरापासून तलाठी कार्यालयात ना हरकत प्रमाणपत्रासाठी फेऱ्या मारत हाेते. प्रत्येकी हजार रुपये दिल्यास अर्ज भरताच थेट ना-हरकत प्रमाणपत्र मिळेल, असे तलाठी खान याने सांगितले होते. 


आदर्श तलाठी खान लाचखोरीतही अव्वल
काही महिन्यांपूर्वीच जिल्हा प्रशासनातर्फे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते खान याचा आदर्श तलाठी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आदर्श कामाबरोबर तो लाचखोरीतही अव्वल असल्याचे बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर सिद्ध झाले. जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालयांतर्गत वर्षभरानंतर ही लाचखोरीची दुसरी कारवाई आहे. वर्षभरापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेतील अव्वल कारकून अभिजीत येवले याला स्वच्छतागृहात लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले होते. 


जळगाव शहरात पिंप्राळा, रथचौक मेहरूण ही तीन तलाठी कार्यालये आहेत. तलाठ्यांच्या दृष्टिकोनातून पिंप्राळा तलाठी कार्यालय हे सर्वाधिक अर्थपूर्ण आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक शहर तलाठी कार्यालयाचा तिसरा मेहरूणचा लागतो. फिरोज खानची आतापर्यंत महसूलमध्ये पंधरा वर्षांची सेवा पूर्ण झाली आहे. तो सुरुवातीला जामनेरनंतर विदगाव तीन वर्षांपासून जळगाव शहर तलाठी म्हणून कार्यरत आहे. दरम्यान खानला लाचखोरीप्रकरणी एसीबीच्या पथकाने पकडल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. 


दरवर्षी हेच नाटक 
वीटभट्टीचालकांनादरवर्षी ना हरकत प्रमाणपत्राची गरज असते. सप्टेंबर महिन्यापासून प्रक्रियेस सुरुवात केली जाते. त्याच महिन्यात प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित असताना तलाठी कार्यालयातील लाचखोरीमुळे दरवर्षी ही प्रकरणे उशिराने हाताळली जातात. यंदाही याच कारणामुळे ममुराबाद येथील वीटभट्टीचालकांचे प्रमाणपत्र रोखलेले होते. अखेर बुधवारी तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर तलाठी खानवर कारवाई झाली. 


 

बातम्या आणखी आहेत...