आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Billion Spending On Sarv Shiksha Abhiyan In Dhule District

धुळे जिल्ह्यातील सर्वशिक्षा अभियान अंतर्गत 1 अब्ज खर्च करूनही गुणवत्तेचा प्रश्नच!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - जिल्ह्यात केंद्र शासनाच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत 11 वर्षांत 1 अब्ज 51 कोटी 43 लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. त्यातून 137 शाळांना इमारती, दीड लाख विद्यार्थ्यांना गणवेश आणि 25 लाख विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एवढा खर्च होऊनही जिल्ह्यातील 13 शाळांना इमारत नसल्याची स्थिती आहे. आता शासनाने या अभियानाच्या अनुदानात कपात करण्यास सुरुवात केली आहे. 2015मध्ये ही योजना बंद करण्याचा शासनाचा मानस आहे.

प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारून पाया भक्कम व्हावा, या उद्देशाने केंद्ग शासनाने 2002-03 या वर्षात सर्वशिक्षा अभियान सुरू केले. त्यासाठी 2009-10 पर्यंतचा कृती आराखडा आखला. मात्र, निर्धारित कालावधीत उद्दिष्टपूर्ती न झाल्याने कार्यक्रमाला 2015 मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्वशिक्षा अभियानासाठी 11 वर्षांत 1 अब्ज 51 कोटी 43 लाख 71 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत प्राथमिक शिक्षणासाठी विविध प्रकारच्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असे असताना अद्यापही काही ठिकाणी सुविधांची वानवा आहे. जिल्ह्यात अभियानांतर्गत सुविधांवर भर देण्यात आल्याने अनेक ठिकाणी शाळा इमारती झाल्या. विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र शौचालयांची सुविधा उपलब्ध झाली आहे.


कोणत्या वर्षात किती निधी आला
आर्थिक वष्रे खर्च झालेला निधी
2002-03 71 लाख 51 हजार
2003-04 5 कोटी 36 लाख 51 हजार
2004-05 5 कोटी 58 लाख 47 हजार
2005-06 8 कोटी 71 लाख 2 हजार
2006-07 11 कोटी 5 लाख 96 हजार
2007-08 11 कोटी 44 लाख 61 हजार
2008-09 15 कोटी 85 लाख 81 हजार
2009-10 9 कोटी 43 लाख 49 हजार
2010-11 24 कोटी 52 लाख 62 हजार
2011-12 30 कोटी 18 लाख 97 हजार
2012-13 28 कोटी 55 लाख
एकूण 151 कोटी 43 लाख 71 हजार


साहित्यनिर्मिती, बांधकामाचे अनुदान बंद
शिक्षकांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी शिक्षकांना शालेय साहित्यनिर्मितीसाठी पाचशे रुपये अनुदान देण्यात येत होते. सलग 11 वर्षांपर्यंत जिल्ह्यात चार कोटी रुपयांचे अनुदान शिक्षकांसाठी खर्च झाले. मात्र, त्यास शैक्षणिक साहित्यनिर्मितीबाबत शिक्षकांचा प्रतिसाद कमीच राहिला. या आर्थिक वर्षात शासनाने शिक्षक अनुदान बंद केले आहे. तसेच उद्दिष्टपूर्ती झाल्यामुळे बांधकामासाठीचे अनुदानही बंद केले आहे.


येथे झाल्या नाहीत शाळा इमारती
अब्जावधी रुपयांचा निधी खर्च झाला असला तरी अद्याप जिल्ह्यात 13 जिल्हा परिषद शाळांना स्वतंत्र इमारती नाहीत. या शाळा शिरपूर आणि साक्री तालुक्यातील आदिवासी क्षेत्रात आहेत. हे अभयारण्याचे क्षेत्र असून तेथे जागा उपलब्ध न झाल्याने शाळांना इमारत करून देण्यात अडचणी आल्या. बहुतांश शाळांना संरक्षण भिंतीची आवश्यकता असताना फक्त 225 शाळांमध्ये त्या बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक शाळा अद्यापही वंचितच आहेत. भौतिक सुविधांची पूर्तता झाली असली तरी गुणात्मक विकासाबाबत सर्वशिक्षा अभियानाला फारसे यश आले नाही. परिणामी 10 वर्षांनंतर खासगी शाळांमध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने वाढली आहे.


यासाठी झाला निधी खर्च
11 वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात 137 शाळा इमारतींचे बांधकाम झाले आहे. 1 हजार 296 अतिरिक्त वर्गखोल्या बांधण्यात आल्या. 224 शाळांना संरक्षण भिंती बांधल्या. 408 शाळांत स्वच्छतागृहे केली. 174 पडक्या शाळांमध्ये दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना बसण्यालायक स्थिती निर्माण केली. जिल्ह्यात 1 हजार 96 प्राथमिक शाळांना ग्रंथालय तर 160 शाळांना संगणक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर दोन वर्षांपासून देण्यात येणार्‍या गणवेश योजनेंतर्गत दीड लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले आहेत. तर मोफत पाठय़पुस्तक योजनेंतर्गत आतापर्यंत 25 लाख विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तके देण्यात आली आहेत.

अपंगांनाही मिळाला आधार
सर्वशिक्षा अभियानांतर्गत अपंग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यात 11 वर्षांत अस्थिव्यंग, अपंग 410 विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या. 4 हजार 684 विद्यार्थ्यांना चश्मे तर 446 विद्यार्थ्यांना कर्णयंत्राचे वाटप करण्यात आले. तसेच 5 हजार 540 अपंग विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार उपचार व साधनांचे वाटप करून त्यांना मूळ प्रवाहात सामावून घेण्यात आले.


शैक्षणिक गरजांची पूर्तता
शासनाकडून मिळालेल्या अनुदानातून आवश्यक त्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील 1 हजार 96 शाळांची पूरक गरजांची पूर्तता झाली असल्याने निधी कपात करण्यात आला आहे. प्रकाश रणदिवे, सहायक कार्यक्रम अधिकारी, सर्वशिक्षा अभियान