आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन महिन्यांच्या कालावधीत वरणगाव रोडवर दुसरा बळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- शहरातील सर्वाधिक खड्डेमय मार्ग असलेल्या वरणगाव रोडवर मंगळवारी सायकलवरून पडल्याने, सुंदरसिंग ईश्वरसिंग ठाकूर (रा.शिवाजीनगर, वय ४१) यांचा जागीच मृत्यू झाला. गेल्या सव्वातीन महिन्यात या मार्गावरील हा दुसरी बळी आहे. तीन महिन्यांच्या काळात खड्ड्यांमुळे दोन जणांचे बळी गेल्यानंतरही पालिका प्रशासन, रस्ता दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यातच व्यस्त आहे.

शहरातील शिवाजीनगरातील रहिवासी सुंदरसिंग ईश्वरसिंग ठाकूर हे रात्री १० वाजेच्या सुमारास सायकलीने या रस्त्यावरून घराकडे येत होते. नाहाटा दालमिल परिसरातील खड्ड्यात सायकल घसरल्याने ते खाली कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याच्या अातील भागात रक्तस्त्राव झाल्याने ते गंभीर जखमी झाले. याबाबतची माहिती शिवाजीनगरात समजताच परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. ठाकूर यांना डॉ. मानवतकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. रात्री १२ वाजेदरम्यान त्यांचा पालिका रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला. सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत संुदरसिंग ठाकूर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, लहान भाऊ असा परिवार आहे. याबाबत चंदनसिंग ठाकूर (रा. शिवाजीनगर) यांनी दिलेल्या खबरीवरून बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

तीनमहिन्यांत दुसरी घटना : राष्ट्रीयमहामार्गावरून शहराला जोडणारा वरणगाव रोड आता मृत्यूमार्ग हाेऊ पाहत आहे. २००५ नंतर या मार्गाचे डांबरीकरण, मजबुतीकरण अशी कामे झालेली नाहीत. यामुळे या रस्त्यांवर खड्ड्यांचा उद्रेक झाला आहे. याच मार्गावर २६ एप्रिलला कंडारी येथील किरण शिवाजी चौधरी (वय २५) या दुचाकीस्वाराचा बळी गेला होता.

मुरूम टाकण्यासाठी पालिकेची चालढकल
पालिकेनेपावसाळ्यात शहरातील विविध खड्डेमय रस्त्यांवर मुरूम टाकून खड्डे बुजवण्यासाठी ठराव केला होता. मात्र, पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत असताना अद्याप मुरूम टाकण्याबाबत निर्णय घेतला जात नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता विरोधी नगरसेवकांसह शहरातील नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत. मामाजी टाॅकीज रस्त्यासाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. याकडेही पालिका दुर्लक्ष करीत आहे. वरणगाव रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यातच आता पथदिवेही बंद असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. पावसाची रिपरिप सुरू असल्याने मोटारसायकल स्लीप होऊन अपघात घडण्याचे प्रकार वाढले आहेत. खड्डेमय वरणगाव मार्गावर समोरून अवजड वाहन आल्यास हेडलाइटच्या प्रकाशामुळे रस्ता दुभाजक दिसत नाही. यामुळेही अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

किती बळी घेणार?
वरणगाव मार्गासाठी आम्ही उपोषण केले होते, यानंतर दोनवेळा निविदा काढली गेली. मात्र, अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. दोन जणांचे बळी गेल्यानंतरही पालिका प्रशासनाकडून सर्वसामान्यांच्या मागणीची दाद घेतली जात नाही. पालिकेला या रस्त्याच्या कामासाठी अाणखी किती बळी हवे आहेत? असा प्रश्न पडतो. प्रदीपदेशमुख, अध्यक्ष, सिद्धिविनायक फाउंडेशन, भुसावळ

दोनवेळा निविदा
वरणगावरोडवर २७ एप्रिलला झालेल्या अपघातानंतर, रस्ता दुरुस्ती करण्याबाबत प्रदीप देशमुख यांनी पालिकेसमोर उपोषण केले. उपोषणामुळे दुसऱ्याच दिवशी या मार्गाच्या कामाला तांत्रिक मंजुरी मिळाली. यानंतर पालिका प्रशासनाने दोनवेळा ई-निविदा प्रसिद्ध केली. मात्र, कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळालेला नाही.
बातम्या आणखी आहेत...