आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉर्निंग वॉकला निघालेल्या दांपत्यास भरधाव कारने उडवले; महिलेचा मृत्यू; चालक फरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अाजारपणातून बरे झाल्यानंतर डॉक्टरांनी पहाटे मोकळ्या हवेत पायी चालण्याचा सल्ला दिला, म्हणून १५ दिवसांपासून मॉर्निंग वॉक सुरू केलेल्या एका दांपत्याला कारने उडवले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला, हे पाहून चालक पसार झाला अाहे. ही घटना रविवारी सकाळी ६.३० वाजता ईच्छादेवी चौफुलीजवळील सदोबा वेअर हाऊस येथे घडली.
मेहरूणमधील जोशी वाड्यातील लक्ष्मण शिवाजी नाईक (वय ४९) त्यांच्या पत्नी रत्नाबाई नाईक (वय ४४) हे रविवारी सकाळी सदोबा वेअर हाऊसकडून इच्छादेवी चौफुलीकडे येत होते. या वेळी त्यांच्या मागून येणाऱ्या (भुसावळकडून धुळ्याकडे जाणारी) मारुती स्विफ्ट कार(डीएल ३सी एझेड ४८५१)ने या दांपत्याला जाेरदार धडक दिली. यात लक्ष्मण नाईक हे दूर फेकले गेले. त्यांना पाठीवर कमरेवर मुकामार लागला; तर रत्नाबाई यांना जोरदार धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे पाहून कारचालक घटनास्थळावरून पसार झाला.
अपघाताचे वृत्त मेहरूणमध्ये कळल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली हाेती. नागरिकांनीच रत्नाबाई यांचा मृतदेह सिव्हिलमध्ये नेला. सकाळी १०.३० वाजता शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी वाजता त्यांच्यावर मेहरूण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, चालकावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक जगदीश देवरे तपास करीत आहेत.
मुलांच्या लग्नाचे स्वप्न रंगवले

नाईक दांपत्याला दोन मुली एक मुलगा आहे. दोन्ही मुलींचे लग्न झाले आहे. त्यांच्या मुलाचे वय २३ असून तो सध्या पोलिस भरतीची तयारी करीत आहे. गेल्यावर्षी त्याची सैन्यदलात निवडही झाली होती. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे त्याला बाहेर पडावे लागले. त्यानंतर तो पुन्हा पोलिस भरतीची तयारी करत आहे. दरम्यान, त्याच्या लग्नाचे स्वप्न दांपत्याने रंगवले होते.

१५ दिवसांपूर्वीच सुरू केले वॉक

लक्ष्मण नाईक हे गेल्या महिनाभरापूर्वी पांढऱ्या पेशी कमी झाल्या म्हणून मेहरूण येथील पटेल हॉस्पिटलमध्ये दाखल होते. तसेच रत्नाबाई यांना रक्तदाबाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे डॉक्टरांनी दोघांना पहाटे मोकळ्या हवेत पायी चालण्याचा सल्ला दिला होता. १५ दिवसांपूर्वीच त्यांनी मॉर्निंग वॉकची सुरुवात केली होती.

सिग्नलचा खांब मोडला

कारचालकाने गतिरोधक टाळण्यासाठी गाडी रस्त्याच्या कडेला घेतली होती. मात्र, याच वेळी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटून कारने थेट दांपत्याला उडवले. त्यानंतर ती रस्त्याच्या कडेला असलेल्या सिग्नलच्या खांबावर आदळली. त्यामुळे कार थ‌ांबली पण यात खांब तुटला. खांब नसता तर कारने अाणखी इतरांना उडवले असते, असे मृत रत्नाबाई यांचे भाऊ तथा नगरसेवक अनिल देशमुख यांनी सांगितले. देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरूनच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.