आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसोदा रस्त्यावरील खड्ड्यांचा दुसरा बळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शिरीष काळे)
जळगाव- आसोदा रस्त्यावरील मोहन टॉकीज ते रेल्वेगेटदरम्यानच्या जीवघेण्या रस्त्याने सहा महिन्यांत दुसरा बळी घेतला आहे. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात असताना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी वाजेच्या सुमारास आसोदा-जळगाव रस्त्यावरील बहिणाबाई कॉलनीजवळ घडली. या घटनेमुळे वाहनधारक, प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
शहरातील भवानीपेठेतील बेंडाळे चौकाजवळील रहिवासी शिरीष पंडित काळे (वय ७० ) हे आसोदा परिसरात असलेल्या शेतीकडे माेटारसायकलीने जात होते. मोहन टॉकीजपासून ते रेल्वे गेटपर्यंतच्या रस्त्यातील खड्डे चुकवत ते मार्गक्रमण करीत होते. यादरम्यान बहिणाबाई कॉलनीजवळ अचानक छातीत कळा आल्याने ते रस्त्यावर पडले. रस्त्यावरील वाहनधारकांनी त्यांना रेल्वेगेटजवळील जकात नाक्यावरील खोलीत बसवले. यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना रिक्षात टाकून खासगी रुग्णालयात नेले असता, त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या नातलगांनी सांगितले. ते शेतीच्या कामासाठी आसोद्याकडे जात होते. त्यांना पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी सून असा परिवार आहे.
आश्वासनानंतर ही दुरुस्ती नाही
खड्डेमय रस्त्यावर २८ डिसेंबर रोजी ६८ वर्षीय नेहेते यांचा दगडावरून गाडी घसरून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पुढील आठ गावांच्या ग्रामस्थांनी आंदोलनही केले होते. यानंतर महापालिकेने महिनाभरात रस्तादुरुस्तीचे आश्वासन दिले होते. मात्र, सहा महिने होऊनही रस्ता दुरुस्त झाला नाही. यानंतर या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. या रस्तादुरुस्तीच्या कामास मंजुरी असतानाही महापालिका प्रशासनाकडून निधीअभावी कामे टाळली जात असल्याने या मार्गावरील आठ गावांतील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.