जळगाव - रामानंद नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक सादरे यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून एक लाख रुपयांची लाच मागितल्याची खळबळजनक तक्रार दोन वाळू ठेकेदारांनी रविवारी केली होती. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे कर्मचारी जीवन पाटील यांना पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी सोमवारी निलंबित केले आहे. तसेच रविवारी रात्री सोमवारी रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील १० कर्मचार्यांचे जबाब पोलिस उपअधीक्षक किशोर पाडवी यांनी नोंदवले.
रामानंदनगर पोलिसांनी रविवारी वाघनगरातील घाट रस्त्यावरून वाळू मुरुमाची वाहतूक करणारे चार डंपर जप्त केले होते. हे डंपर सोडण्यासाठी सादरे यांनी रवींद्र चौधरी सागर चौधरी यांना घरी बोलावून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत एक लाख मागितल्याची तक्रार चौधरी यांनी केली होती. दरम्यान, पोलिस अधीक्षक डॉ.सुपेकर उपअधीक्षक पाडवी यांनी रविवारी रात्री ११.३० वाजेपर्यंत रामानंदनगर ठाण्यात ठाण मांडले होते. सोमवारी या प्रकरणात पोलिस अधिक्षक यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे कर्मचारी पोलिस कर्मचारी जीवन पाटील यांना निलंबित केले.
सादरे सुटीवर : हाप्रकार घडल्यानंतर रविवारी रात्री पाडवी यांनी सादरे यांच्या घरी पोलिस कर्मचारी पाठवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते घरी आढळून आले नाहीत. तसेच मंगळवारपर्यंत ते सुटीवर असल्याची माहिती पाडवी यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात सादरे यांचा जबाब महत्त्वाचा असून, तो बुधवारी नोंदवला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर तक्रारदारांचा जबाब नोंदवला जाणार आहे. चौकशीअंती निघणार्या निष्कर्षावरून कारवाई करण्यात येणार आहे.
रेकॉर्डिंग मागवले
तक्रारदारांनी सादरेंशी मोबाइलवरून झालेल्या संवादाचे रेकॉर्डिंग असल्याचे पाडवी यांना सांगितले होते. त्यामुळे ते रेकॉर्डिंगही मागवून घेतले असून, त्याबाबतही चौकशी केली जाईल, असे पाडवी यांनी सांगितले.
खडसेंच्या दबावाची चर्चा
सादरेंवर कारवाई करण्यासाठी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दबाव टाकल्याची चर्चा रविवारपासून रंगली आहे. वाळूमाफियांची बाजू घेण्यासाठी खडसेंनी फोन केले, अशी माहिती या प्रकरणात समोर आली आहे.