आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबार जिल्ह्यात 10 महिन्यांत झाला हजार बालकांचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार - विकासाचे प्रतीक असलेल्या ‘आधार’चा आरंभ झाल्यामुळे देशाच्याच नव्हे, तर जगाच्या नकाशावर चर्चेचा विषय बनलेल्या नंदुरबार जिल्हय़ात गेल्या दहा महिन्यांत वेगवेगळय़ा कारणांमुळे 1 हजार 25 बालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हय़ाचा बालमृत्युदर तब्बल 42.10 वर पोहोचला आहे.

कुपोषण आणि बालमृत्यूसंदर्भातील एका संक्षिप्त टिप्पणीतून हा खुलासा झाला आहे. आरोग्य विभागासमोर असलेल्या विविध अडचणींवरही या टिप्पणीतून प्रकाश टाकण्यात आला आहे. जिल्हय़ातील सहा तालुक्यांपैकी अक्कलकुवा तालुक्यातील परिस्थिती सर्वाधिक भीषण असून तिथला अर्भक मृत्युदर 43.20 तर बालमृत्युदर तब्बल 48.60 वर पोहोचला आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील रोजकुंड येथील विक्रम रोहत्या वसावे या दहावर्षीय बालकाचा गेल्या महिन्यात मृत्यू झाला होता. वैद्यकीय अधिकार्‍यांनी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध करून न दिल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात येते आहे. त्यानिमित्ताने तयार करण्यात आलेल्या टिप्पणीतील भाग ‘दिव्य मराठी’च्या हाती लागला असून त्यातून ही खळबळजनक आकडेवारी समोर आली आहे. जिल्हय़ातील सहा तालुक्यात एप्रिल 2012 ते जानेवारी 2013 अखेर 28349 बालकांचा जन्म झाला. त्यापैकी 1 वर्ष वयापर्यंतची एकूण 727 बालके मृत्युमुखी पडली आहेत. एक ते सहा वर्षे वयाच्या आतील 297 बालकांनाही प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे जिल्हय़ाचा अर्भक मृत्युदर 31.50 झाला असून बालक मृत्युदर 42.10 झाला आहे.