आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक हजार कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र राबून भुसावळ-सुरत रेल्वेमार्ग केला पूर्ववत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार - रेल्वेच्या तब्बल एक हजार कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम करून पाचोराबारी येथील खचलेला तीन किलाेमीटर रेल्वेमार्ग केवळ ५५ तासांत दुरुस्त केला. त्यामुळे सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू झाली आहे. या मार्गावरून दररोज ३२ रेल्वे गाड्या ये-जा करीत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

रविवारी (ता.१०) रात्री ११.३७ वाजता सुरत-नंदुरबार मेमो पॅसेंजर गाडी पाचोराबारी येथे पाेहोचली. तेव्हा इंजीन चालक सुरेश मीना तसेच गार्ड किशोर पटेल यांनी प्रसंगावधान राखून गाडी थांबवली. त्यामुळे नाल्याच्या पुराची परिस्थिती पाहून सर्व प्रवाशांना पाचाेराबारी येथेच उतरवून देण्यात आले होते, अशी माहिती आता समोर येत आहे. १२ डब्यांपैकी ११ डबे सुरक्षित ठेवण्यात रेल्वेचालकाला यश मिळाले असून, एक डबा पूर्णपणे निकामी झाला आहे. एका डब्याला तयार करण्यासाठी ७० लाख ते काेटी रुपयांचा खर्च येत असतो. रेल्वेचे १२ पैकी ११ डबे सुरक्षितपणे काढावे लागल्याने रेल्वेरुळाला दुरुस्ती करण्यास अधिक वेळ लागला, अशी माहिती या वेळी देण्यात आली. दुर्घटनाग्रस्त भागातील रेल्वेरूळ दुरुस्तीसाठी बाहेरून साधनसामग्री मागविण्यात आली होती. त्यासाठी जवळपास लाख ५० हजार रुपयांचा खर्च रेल्वे प्रशासनाला आला.

रेल्वेरूळ दुरुस्त झाल्यानंतर काल बुधवारी सकाळी ६.३४ वाजेच्या सुमारास रिकामी मालगाडीची चाचणी घेण्यात आली. या गाडीचा वेग प्रतिकिमी १० किमी एवढा होता, असेही सांगण्यात आले.
सुरत-भुसावळ हा रेल्वेमार्ग महत्त्वाचा मानला जातो. या लोहमार्गावरून दररोज ३२ गाड्यांची ये-जा होते. पाचाेराबारी येथे नाल्याच्या पुरामुळे रेल्वे ट्रॅक खचल्याने जवळपास ५५ तास रेल्वेसेवा खंडित झाली होती. ही सेवा आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. ज्या दिवशी दुर्घटना घडली त्या दिवशी १२८४३ पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस गाडीमधील प्रवाशांना नंदुरबार रेल्वेस्थानकावर उतरवून देण्यात आले. यातील बहुतांशी प्रवाशांचे पैसे परत करण्यात आल्याची माहितीही रेल्वे सूत्रांनी दिली. सुरत-भुसावळ पॅसेंजर, गांधीधाम-विशाखापट्टणम, सुरत-पुरी, सुरत-भागलपूर, बिकानेर-सिकंदराबाद, बिकानेर-नांदेड, सुरत-माल्दा, अोखा-रामेश्वर, अहमदाबाद-नागपूर प्रेरणा, अहमदाबाद-पाटणा, अहमदाबाद-यशवंतपूर या सर्व एक्स्प्रेस, सुरत-भुसावळ पॅसेंजर आदी गाड्या या मार्गावरून रद्द करून अन्य मार्गावरून वळविण्यात आल्या होत्या. सुतारपाडा, वाघाडे, सोनगीरपाडा, ढेकवद या भागात रविवारी (ता.१०) ७.४५ ते ११.४५ दरम्यान मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पाचोराबारी गावात प्रचंड नुकसान झाले. दरम्यान याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.
अजूनही काम सुरूच
सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावरील सर्व ३२ गाड्या सुरू झाल्या आहेत. रेल्वेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्घटनेची दखल घेत रेल्वेरूळ लवकर दुरुस्त केला. एक हजार कर्मचारी त्यासाठी कामाला लागले होते.अजूनही काम सुरू आहे. बी.एल. मंडल, अधिकारी, पश्चिम रेल्वे
पूर्ण दुरुस्तीला एक महिना
रेल्वेच्यारुळाची दुरुस्ती झाली असली तरी या मार्गावरील रूळ दुरुस्तीसाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. जर पाऊस आला तर हा कालावधी वाढूही शकतो, असे सांगण्यात आले. पाचोराबारीत दररोज २५० रेल्वे कर्मचारी काम करीत असून, खचलेल्या जागी गाड्या संथ गतीने चालत आहेत.
बातम्या आणखी आहेत...