आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत एकाच भिंतीआड मुला-मुलींची स्वच्छतागृहे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था असलीतरी ती एकमेकांना जोडूनच आहे. त्यामुळे अपवाद वगळता काही शाळांमध्ये मुलींची कुचंबणा होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. 120 विद्यार्थ्यांमागे एक स्वच्छतागृह हे प्रमाण खाजगी शाळांमध्ये अपवाद वगळता कुठल्याच शाळेत पाळले गेल्याचे दिसून येत नाही.

‘दिव्य मराठी’ने सुरू केलेल्या अभियानात शहरातील जिल्हा परिषद, महापालिका व खासगी शाळांमध्ये असलेल्या स्वच्छतागृहांची पाहणी केली. पाहणीअंती मुलींच्या स्वतंत्र स्वच्छतागृहाचा विषय गांभीर्याने घेतला जात नसल्याची बाब पुढे आली आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे सर्वच शाळांमध्ये स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था केली. पण त्याचे बांधकाम एका भिंतीआड आहे. परिणामी, त्यामुळे विद्यार्थिंनीसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. याची साधी दखल घ्यायलादेखील प्रशासन, संस्थाचालक तयार नसल्याची ओरड केली जाते आहे. जिल्ह्यात 31 शाळा अशा आहेत की त्यामध्ये स्वतंत्र शौचालयांचीदेखील व्यवस्था नाही.

मोजक्या शाळेतच स्वतंत्र सोय

शहरातील वेगवेगळय़ा 19 इमारतींमध्ये या शाळा भरतात. खासगी शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आहेत; मात्र काही ठिकाणी स्वच्छतागृहांमध्ये जाण्याचा मार्ग मुले आणि मुलींसाठी एकच आहे. फार कमी शाळांमध्ये मुले आणि मुलींच्या स्वच्छतागृहांची वेगवेगळी सोय केली आहे.

बांधकाम करणे सोपे जाते म्हणून

शाळांच्या इमारतींचे बांधकाम करत असताना ड्रेनेज, सेफ्टी टँकची व्यवस्था एकाच ठिकाणी व्हावी म्हणून स्वच्छतागृहे जोडून बांधलेली असतात. कारण बांधकामास ते सोपे जाते. शिवाय वेगवेगळे बांधण्याचा खर्चही वाचतो, असे एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले; मात्र यासंदर्भात शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारची विचारणा होत नाही.

काय म्हणतो शासन निर्णय?

शासन निर्णयानुसार शाळांमध्ये मुले आणि मुलींचे स्वच्छतागृह वेगवेगळ्या इमारतींमध्ये असले पाहिजे. तसेच विद्यार्थीपटानुसार 120 मुलांसाठी तीन स्वच्छतागृहे व एक शौचालय असले पाहिजे. पण नामांकित आणि विद्यार्थी संख्या अधिक असलेल्या संस्थांमध्येही हा निकष पाळला जात नाही.