आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- जिल्हा न्यायालयासमोर दहा वर्षांपूर्वी एका जणावर गोळीबार करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एस.दीक्षित यांनी सोमवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांच्यासह आणखी दोन जणांना एक वर्ष कैद व दंडाची शिक्षा ठोठावली.
शहरातील धनराज देवीदास चौधरी याच्यावर जिल्हा न्यायालयासमोर 12 जून 2003 रोजी ललित कोल्हे यांच्यासह समाधान सुधाकर शेजवळ व विलास नंदू सोनवणे यांनी गोळीबार केला होता. त्यात धनराज गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर कोल्हे यांनी त्यास प्रथम डॉ.भंगाळे यांच्या व नंतर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तसेच धनराजनेच आपल्यावर गोळीबार केला, अशी फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी चौकशी केली असता ललित कोल्हे यांनीच धनराजवर गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे कोल्हेंसह तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राज चाफेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हा न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एस.दीक्षित यांच्यासमोर याप्रकरणी खटला सुरू होता. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात बापू पवार, दिलीप सोनार, डॉ.अर्जुन भंगाळे, धर्मेंद्र ठाकरे, विजय साळुंखे, विष्णू बेलदार, डॉ.शिरीष बेलदार, सुधाकर खैरनार, राज चाफेकर, सुनील ठाकूर यांचा समावेश होता. शिक्षा सुनावलेल्यांमध्ये ललित कोल्हे, समाधान शेजवळ व धनराज सोनवणे यांचा समावेश आहे. त्यातील एक आरोपी विलास नंदू सोनवणे हा मृत झाला आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अँड.टी.डी.पाटील, अँड.प्रतिभा पाटील व अँड.ललिता पाटील यांनी, तर आरोपींतर्फे अँड.डी.जे.पाटील यांनी काम पाहिले. दरम्यान, शिक्षा सुनावल्यानंतर लागलीच कोल्हे यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायाधीश दीक्षित यांनी त्यांच्यासह दोघांना 15 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
कोल्हे अपिलात जाणार
सत्र न्यायालयाने आमचे अशील कोल्हे यांना एक वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करणार आहोत, असे कोल्हे यांचे वकील बिपीन पाटील यांनी सांगितले.
शाखा स्थापन करण्याचा धडाका
गेल्या काही महिन्यात ललित कोल्हे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा स्थापन करण्याचा धडाका सुरू केला होता. मोठय़ा प्रमाणात तरुणाईला आकर्षित करण्यात त्यांना यश येत होते. यामुळे प्रस्थापितांना त्यांचा धाक वाटावा असे वातावरण तयार होत होते. त्यात कोल्हेंवर न्यायालयाने शिक्षा देऊन गुन्हेगार असल्याचा शिक्कामोर्तब केल्यामुळे त्यांच्या वाटचालीला काही प्रमाणात ब्रेक लागणार आहे.
तर उमेद्वारी करू शकतात
एखाद्या आरोपीला कोणत्याही न्यायालयाने शिक्षा सुनावली असेल तर शिक्षेच्या कालावधीदरम्यान तो व्यक्ती कोणतीही निवडणूक लढवू शकत नाही. जर त्याच्या शिक्षेला वरच्या न्यायालयात स्थगिती मिळाली तर तो निवडणुकीसाठी पात्र ठरू शकतो.
-अँड.अकील इस्माईल, ज्येष्ठ विधिज्ञ.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.