आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ; फसवणुकीच्या तक्रारीत वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - घरबसल्या इंटरनेटचा उपयाेग करून ऑनलाइन शॉपिंगच्या साइटवरून खरेदी करण्याची क्रेझ सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ही खरेदी आनंददायी वाटत असली तरी, काही ग्राहकांची यात फसवणूक होत आहे. शिवाय अशा प्रकरणांमध्ये न्यायालयात दाद मागणेही अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करताना काळजी घेणे, हा एकमेव पर्याय समोर येत आहे.

पूर्वी केवळ इलेक्ट्रॉनिक्स् वस्तूंची ऑनलाइन खरेदी होत असे. आता कपडे, बुट, चप्पल यासारख्या सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूही अॉनलाइनच्या माध्यमातून मागवल्या जात आहेत. चार-चौघांत वेगळेपण सिद्ध करण्यासाठीही अनेक जण भ्रमणध्वनीवरूनच वस्तू बुक (अारक्षित) करतात. साधारणपणे ते दिवसांत आपण अारक्षित केलेली वस्तू घरपोच पाेहाेचते. सुरुवातीला नवीन असेपर्यंत वस्तूंविषयी काहीच वाटत नाही.

मात्र, नंतर त्यात काही बिघाड झाला तर ग्राहकांना दुकानाचे नाव, कंपनीचा पत्ता, कस्टमर केअर नंबर या सर्व गोष्टी शाेधण्याची गरज पडते. यासंदर्भात आपण सुरुवातीला कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नसल्याचे लक्षात येते आणि नंतर मनस्ताप होतो. अशा प्रकारे फसवणूक झाल्याच्या दोन तरी तक्रारी महिन्याला ग्राहक न्यायालयात दाखल होतात. त्यावर सुनावण्याही सुरू आहेत. परंतु अाॅनलाइन शाॅपिंगबाबत न्यायालयात दाद मागणे कठिण असल्याने ग्राहकांचा मनस्तापही हाेत असताे.

अशी घ्यावी ग्राहकांनी काळजी
ज्या उत्पादनाची खरेदी करणार असाल, सर्वप्रथम त्याच्या बिलाची मागणी करा.
कंपनीने उत्पादनाची वॉरंटी दिलेली असते. मात्र, ऑनलाइनमध्ये वॉरंटी कार्ड मिळत नाही. त्याची मागणी करा. शक्यतो असेच उत्पादन खरेदी करा, ज्या उत्पादनाचे सर्व्हिस स्टेशन, आपण राहतो त्या शहरात असेल. शक्यतो जास्त महागड्या वस्तू ऑनलाइन पद्धतीने खरेदी करू नका.

काय म्हणतो कायदा?
ग्राहकसंरक्षण कायद्याच्या कलम ११/२ ‘अ’ नुसार ग्राहक त्या व्यक्ती, संस्थेविषयी तक्रार करतो. जी व्यक्ती किंवा संस्था ग्राहक तक्रार करत असलेल्या जिल्ह्यातील असावी. ‘ब’ नुसार संबंधित संस्थेचे एकापेक्षा जास्त कार्यालय, सर्व्हिस स्टेशन जिल्ह्यात असावे आणि ‘क’ नुसार वादाचे कारण पूर्णत: किंवा अंशत: त्याच जिल्ह्यात घडलेले असावे. या कलमाचा विचार केला असता, ग्राहकांनी खूप काळजी घेणे आवश्यक आहे.

खटला क्रमांक 1
येथील पंकज पाटील (नाव बदललेले) यांनी ऑक्टोबर २०१४ मध्ये मोटोरोला कंपनीचा १२ हजार ९९९ रुपयांचा मोबाइल खरेदी केला. या मोबाइलमध्ये पहिल्या दिवसापासून नेटवर्क प्रोब्लेम होता. आठच दिवसांत पाटील यांनी कस्टमर केअरशी बोलून शहरातील सर्व्हिस सेंटरवर मोबाइल दुरुस्तीसाठी दिला. तो अद्याप दुरुस्त करून मिळालेला नाही. त्यामुळे पाटील यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली आहे. १५ सप्टेंबर रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. व्याजासह पैसे परत मिळावे किंवा नवीन मोबाइल द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. न्यायालयाचा निकाल लागण्यास अजून उशीर आहे. तोपर्यंत पाटील यांना मनस्ताप तर होईलच, शिवाय त्यांचे पैसेही खर्च होत आहेत. अॅड. हेमंत भंगाळे हे त्यांचा खटला चालवत आहेत.
बिल, वाॅरंटी कार्ड महत्त्वाचे
ग्राहकांनी ऑनलाइन शॉपिंग करताना बिल, वॉरंटी कार्डची मागणी केली पाहिजे. फसवणूक झाल्यास याच गोष्टी प्रबळ पुरावा म्हणून वापरल्या जातात. सध्या ऑनलाइन शॉपिंगसंदर्भात तक्रारी वाढत आहेत. अॅड. हेमंत भंगाळे