आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Online Voter Registration Marathi News At Jalgaon, Divya Marathi

ऑनलाइन नोंदणीत 329 मतदारांचे अर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मतदार नोंदणी अधिक लोकाभिमुख करण्यासाठी निवडणूक आयोगाने ऑनलाइन मतदार नोंदणीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यात ऑनलाइन नोंदणी, दुरुस्ती आणि नाव वगळण्यासाठी 329 ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. ऑनलाइन नोंदणीला प्रतिसाद असला तरी तांत्रिक त्रुटींमुळे अर्ज पेंडिंग राहण्याचेच प्रमाण अधिक आहे.

मतदार यादीमध्ये नोंदणी करणे, ओळखपत्र मिळविणे यासाठी मतदान केंद्रावर जाणे, केंद्रप्रमुखाकडे चकरा मारणे, त्यांच्याकडून होणार्‍या तांत्रिक चुकांमुळे फोटो, नाव, पत्त्यात चुका होण्याचे प्रमाण अधिक आहे. या गोष्टींमुळे नागरिक नोंदणी टाळतात. अशा मतदारांसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन हा उत्तम पर्याय आहे. सोईनुसार नोंदणी करून कागदपत्रे सोबत जोडल्यास वेळेचा अपव्यय टळून नागरिकांना मतदार नोंदणी करता येणे शक्य आहे.

ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर अर्ज डाऊनलोड केला जातो. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर नोंदणी केली जाते. जिल्ह्यात ऑनलाइनला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मनोहर चौधरी, उपजिल्हाधिकारी, निवडणूक शाखा.

असे प्राप्त झाले ऑनलाइन अर्ज
चोपडा (13), रावेर (21), भुसावळ (64), जळगाव शहर (108), जळगाव ग्रामीण (20), अमळनेर (11), एरंडोल (11), चाळीसगाव (21), पाचोरा (17), जामनेर (27), मुक्ताईनगर (16).

ऑनलाइन कागदपत्रे आवश्यक
मतदाराचे छायाचित्र आणि सोबत जोडायची इतर कागदपत्रे स्कॅन करून घेणे आवश्यक आहे. अर्ज भरताना ती कागदपत्रे सोबत जोडावी लागतात. मतदाराला प्राप्त झालेल्या आयडीच्या सहाय्याने अपूर्ण प्रक्रिया पूर्ण करता येते. ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर निवडणूक विभागाकडून तो डाऊनलोड केला जातो. स्थानिक केंद्रप्रमुखाकडून कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर नोंदणी होते.

मतदार यादीही ऑनलाइन
मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन ‘इलेक्ट्रोरल सर्च’ या लिंकवर यादी पाहता येते. जळगाव एनआयसी या संकेतस्थळावरदेखील ही यादी आहे.

मतदारांमध्ये जागृतीचा अभाव
संगणक आणि मोबाइलवर इंटरनेटचा वापर करणार्‍या नागरिकांची संख्या मोठी असली तरी ऑनलाइन रजिस्ट्रेशनसारख्या ई-सुविधांचा वापर करणारे नागरिक अत्यंत कमी आहे. जळगाव जिल्ह्यात या सुविधेचा फारसा वापर होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. आयोगाकडे येणार्‍या ऑनलाइन अर्जामध्ये जळगावचा प्रतिसाद नगण्य आहे.

नोंदणीची पद्धत सोपी
संकेतस्थळावर ऑनलाइन व्होटर रजिस्ट्रेशन या लिंकला क्लिक करावे लागते. त्यानंतर येणार्‍या फोल्डरवर स्वत:चा मोबाइल क्रमांक नोंदवावा लागतो. त्यानंतर पुढची कमांड, कागदपत्रांची जोडणी करून फाइल सेव्ह करावी लागते.