अमळनेर - तापीला पूर नसूनही पाडळसरे धरणाचे पाणी बांधापर्यंत पोहोचले असून, त्याचा जलफुगवटा 5 किमी अंतरावरील बोहरा गावापर्यंत जाऊन पोहोचला आहे. गतवर्षी याच जागी ठणठणाट असलेल्या पात्रात आज दोन टीमएसी पाणी दिसू लागल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पाडळसरे धरणाचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची जिद्द ठेवून आमदार साहेबराव पाटील यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने धरणात एवढा पाणीसाठा झाला आहे. पाडळसरे धरणाच्या तळाचे काम पूर्णत्वास आले असून, 23 गाळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. आमदार साहेबराव पाटील यांनी धरणस्थळी जाऊन याबाबत पाहणी केली. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, डांगरीचे अनिल शिसोदे, पाडळसरे येथील सचिन पाटील, भागवत पाटील, मारवडचे सरपंच दिलीप पाटील व परिसरातील नागरिक होते. पाऊस वा पूर नसतानाही इतर ओढे-नाल्यांतील अल्प पाणी या धरणात आल्याने आज चांगले चित्र दिसू लागले आहे.
23 गाळ्यांच्या संधानकांचे काम पूर्ण
या प्रकल्पाच्या 139.24 मीटर तलांकापर्यंत मूर्धापातळीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच पुढील टप्प्यात 143.50 मीटर तलांकापर्यंत प्रस्तंभांचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी भूसंपादन व पुनर्वसन करावयाच्या अनुषंगिक बाबी सन 2013-2014 या आर्थिक वर्षाच्या नियोजनानुसार होत आहेत. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे, पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम, प्रधान सचिव एकनाथ पाटील, संचालक प्र.रा.भामरे, व्ही.डी.पाटील, अ.ना.पवार, कार्यकारी अभियंता ए.बी.कुळकर्णी यांच्या सूचनेनुसार हतनूर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे, सहायक अभियंता अनिल सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी ई.एम.सौदागर, म.उ.गिरासे, ल.ना.सोनवणे, स्थापत्य कंत्राटदार प्रकाश पाटील, तत्कालीन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांचे सहकार्य लाभत आहे. आता केवळ तळापासून तीन मीटर पाणी भरणे बाकी आहे. ते भरल्यानंतर 8 मीटरएवढा साठा राहील व त्याचा जलफुगवटा 17 ते 20 किमीपर्यंत जाईल.
आतापर्यंत काय झाले?
सन 1998 साली 142 कोटी 84 लाख रुपयांच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्या वेळी केवळ 6 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यानंतर 12 वर्षे हा प्रकल्प रखडत राहिला. 2 मार्च 2011 रोजी या प्रकल्पाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार साहेबराव पाटील यांना दिले.
अशा झाल्या बैठका
21 आॅक्टोबर 2010 रोजी पहिली बैठक धरणासंदर्भात झाली. 8 एप्रिल 2013 रोजी दुसरी बैठक, 10 डिसेंबर 2013 रोजी तिसरी बैठक, 5 एप्रिल रोजी महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात नियम 105प्रमाणे आमदार पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली, 10 जून 2014 रोजी चौथी बैठक. या बैठका घेण्यास मंत्र्यांना प्रवृत्त करून या धरणाच्या कामासाठी आमदार पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
आतापर्यंत उपलब्ध निधी
सन 2010 ते 2014 या कालावधीत या धरणासाठी महाराष्ट्र शासनाकडून 375 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.याच नदीवर नीम गावाजवळ नीम-मांजरोद पुलाच्या कामासाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, हे काम निविदाप्रक्रियेपर्यंत आले आहे. तसेच साने गुरुजी उपसा जलसिंचन योजना याच पाण्यावर प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यासाठी 2 कोटी 51 लाखांचा निधी मंजूर झाला असून, हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. यासह कपिलेश्वर मंदिरालगत 4 कोटी 50 लाख रुपये खर्चाची संरक्षक भिंत बांधली जाणार असून, या कामाचा प्रस्तावही शासनाकडे पाठवण्यात आला आहे.