आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Opposition Leader Eknath Khadase Visit To Jalgaon Jail

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारणाची नांदी: एकनाथ खडसे यांच्या जेल भेटीला शासकीय झालर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ठरल्याप्रमाणे जळगाव कारागृहात सोमवारी भेट दिली. ही भेट अन्य कारागृहांच्या पाहणीप्रमाणेच असल्याचे सांगत भेटीला शासकीय झालर लावण्यास खडसे विसरले नाहीत. ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर या भेटीमागे राजकीय कारण असले तरी त्याचे खडसे यांनी खंडण केले आहे. कारागृहातील भेटीत झालेल्या चर्चेबाबत राजकीय वतरुळात तर्कवितर्क लढवले जात असून ही आगामी राजकारणाची नांदी मानली जात आहे.

महापालिका निवडणुकीचे काउंटडाऊन मंगळवारपासून सुरू होत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून मुलाखतींचा सपाटा सुरू झाला आहे. येत्या चार-पाच दिवसांत अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. शहरात आचारसंहिता सुरू असून यादरम्यान एकनाथ खडसेंच्या कारागृहातील भेटीबाबत गेल्या तीन दिवसांपासून चर्चा सुरू होती. ‘दिव्य मराठी’शी बोलताना खडसेंनी सोमवारी भेट देणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार खडसे एकही कार्यकर्ता सोबत न घेता फक्त अंगरक्षकांसह दुपारी 2 वाजेच्या सुमारास कारागृहात दाखल झाले आणि 2 वाजून 50 मिनिटांनी बाहेर पडले. तब्बल 50 मिनिटे खडसे कारागृहाच्या आवारात होते. यादरम्यान चार पोलिस कर्मचारी बाहेर पडले तर महिला पोलिस कारागृहात गेल्या. दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चहा घेऊन एक जण आत शिरला. भेटीदरम्यान खडसेंसोबत कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे यांनी देखील शासकीय दौरा असल्याचे सांगितले.

खडसे उवाच
महाराष्ट्राच्या विधानसभेचे सत्र नुकतेच संपले. यात संपूर्ण महाराष्ट्रातील तुरुंगांसंदर्भात असलेल्या सुरक्षेवर चर्चा झाली. अबू सालेमवर हल्ला झाला, त्या ठिकाणी रिव्हॉल्व्हर कसे आले? अंडासेलमधील मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. यासंदर्भात येरवडा, ऑर्थररोड जेल, नाशिक सेंट्रल जेल यांना मी भेटी दिल्या. त्याचप्रमाणे जळगाव कारागृहात काय व्यवस्था आहे? याची पाहणी करण्यासाठी वरिष्ठांच्या परवानगीने मी येथे आलो. विशिष्ट व्यक्तीच्या भेटीसाठी केव्हाही येता येईल, पण संपूर्ण जेलमधील कैद्यांना काय सुविधा आहेत; याची पाहणी बराकींना भेट देऊन केली. रमजान महिना असून कैद्यांना काही अडचणी तर नाही ना? याचीही विचारणा केली. कारागृहातील परिसर स्वच्छ व सुंदर आहे. येथे झाडे-झुडपे लावली आहेत. महापालिका निवडणुकीविषयी कोणतीही चर्चा झाली नाही. कारागृह पाहणीचा उद्देश होता, तो यशस्वी झाला.

नजर खडसेंच्या हालचालींवर
‘दिव्य मराठी’त आलेल्या वृत्तानंतर दुपारपासून कारागृहाच्या आवारात येणार्‍यांचे प्रमाण वाढले होते. या वेळी खान्देश विकास आघाडीशी संबंधित असलेले कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक हे देखील तळ ठोकून होते. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीमागे नेमके कारण काय? यावर आता खल सुरू झाला आहे.

भेट आताच का?
राज्याचे विरोधी पक्षनेते खडसे हे गेल्या दोन वर्षांत कधीच कारागृहात पाहणीसाठी गेले नव्हते. यापूर्वी त्यांनी ऑर्थररोड जेलची 23 नोव्हेंबर 2010 रोजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यासह पाहणी केली होती. मात्र, पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना खडसेंचे जळगाव कारागृहात जाण्यामागचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘7 शिवाजीनगर’शी एकनिष्ठ असलेले अतुलसिंग हाडा भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर लवकरच प्रदीप रायसोनींच्या जवळच्या व्यक्तीचा प्रवेश सोहळा होणार असल्याचे बोलले जात आहे. भेटीमागे हेच तर कारण नाही ना? आताच भेटीचे नियोजन कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रायसोनींना दुरूनच बघितले
भेटीसंदर्भात खडसेंना विचारणा केली असता या वेळी प्रत्येक बराकीजवळ जाऊन चौकशी केली. मुक्ताईनगर येथील काही कैदी होते त्यांचीही विचारपूस केली. प्रदीप रायसोनी यांना दुरूनच बघितले. त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नसल्याचे खडसेंनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.