जळगाव - बियाण्यांचे दर ५० टक्क्यांनी कमी झाल्याने माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या अभिनंदनाच्या मांडलेल्या ठरावावर आक्षेप, सभेच्या सुरुवातीस होणारे इतिवृत्ताचे वाचन, २० टक्के उपकर निधीतून शिलाई मशीनचे वितरण, पाणीपुरवठा योजनेत निकृष्ट दर्जाच्या पाइपांचा केलेला वापर यासह आयत्या वेळेच्या विषयांवर मंगळवारी जि.प. च्या सर्वसाधारण सभेत खडाजंगी झाली. या वेळी विषयपत्रिकेतील तीन विषयांसह आयत्या वेळेच्या १० विषयांना मंजुरी देण्यात आली. दरम्यान, ही सर्वसाधारण सभा नेहमीप्रमाणे निवडक चार ते पाच सदस्यांच्या वलयातच पार पडली. काही विषयांवर सत्तारूढ सदस्यांमध्येच दुफळी दिसून आली.
जिल्हाभरात बियाण्यांचा काळाबाजार सुरू असताना बहुमताच्या जोरावर सत्तारूढ पक्ष बियाण्यांचे भाव ५० टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा करून माजी महसूलमंत्री खडसे यांच्या अभिनंदनाचा ठराव करत आहे. मात्र, हे चुकीचे असल्याचे सांगत सदस्य डॉ.उद्धव पाटील रमेश पाटील यांनी यावर आक्षेप घेतला. या वेेळी सदस्य प्रकाश सोमवंशी डॉ.उद्धव पाटील यांच्यात हमरीतुमरी झाली. अशोक कांडेलकर यांनी ही पक्षाची भावनात्मक बाब असल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. तथापि, डॉ. पाटील यांनी मार्चनंतर होणाऱ्या सभेत खरिपाचे नियोजन बियाण्यांची स्थिती या विषयांवर चर्चा घेण्याचा ठराव मांडला. तसेच कृषी अधिकारी मधुकर चौधरी यांनी बोगस बियाण्यांप्रकरणी मारलेल्या छाप्यांबद्दल त्यांच्याही अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.
शिलाई मशीनचे निरर्थक वितरण
मार्चएंडचे काम पूर्ण झाले असताना इतिवृत्तास इतका उशीर का? असा प्रश्न संजय गरुड यांनी उपस्थित केला. इतिवृत्ताचे संकलन चुकीच्या पद्धतीने केले जात असल्याने या विषयावर बराच वेळ खल झाला. तसेच शिलाई मशीनची गुणवत्ता प्रकाराबाबत पुष्पा तायडेंसह अन्य महिला सदस्यांनी आक्षेप नोंदवले. त्यावर अहवाल देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिले.
‘जलयुक्त’च्यानवीन कामातच रस
आयत्यावेळेत मांडलेल्या निविदा, स्वीकृती, कार्यारंभ आदेश अवलोकनार्थ ठेवण्याच्या विषयावर लघुसिंचन विभागातील लिपिकाने मांडलेल्या टिप्पणीबाबत प्रकाश सोमवंशी यांनी दोष दाखवले. लघुसिंचनच्या अधिकाऱ्यांना ठेकेदारांना वाचवण्यात अधिक रस असल्याचे कांडेलकर यांनी सांगितले. शिक्षकांच्या भविष्यनिर्वाह निधीचे खाते अपडेट नसल्याचे सदस्य हर्षल पाटील यांनी सांगितले. महिलांना स्वयंपाकाचे प्रशिक्षण देण्यासह पिठाची गिरणीऐवजी शिलाई मशीन देण्याच्या विषयावर चांगलीच चर्चा रंगली.
दोघांकडून बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन
प्रकाशसोमवंशी अशोक कांडेलकर हे प्रत्येक सभेत अन्य सदस्यांवर दबाव आणतात. सभागृहात आपल्याशिवाय दुसऱ्याची छाप पडता कामा नये, अशी त्यांची इच्छा असते. नवीन सदस्यांना बोलण्याची कुठलीही संधी ते देत नाहीत. तसेच बांधकाम ठेकेदाराच्या गटापुरत्या विषयातच त्यांना रस आहे. सभेत नेहमीच बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन ते आपल्या विषयांतून करून देत असतात त्याचे त्यांना भान नसते. सभेवर ताबा घेण्याचा या दोघांचा प्रयत्न असतो, अशी तक्रार अभ्यासपूर्ण विषय मांडणारे सदस्य डॉ.उद्धव पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केली.
हापूसची मेजवानी
सभेआधी अध्यक्षा प्रयाग काेळी यांच्याकडून त्यांच्या निवासस्थानी सदस्यांना भोजनात हापूस आंब्याच्या रसाची मेजवानी देण्यात आली होती. मात्र, अनेक सदस्य या मेजवानीपासून वंचित राहिल्याने पक्षासह विरोधक सदस्यांनी भरसभेत याविषयी कोपरखळ्या मारल्या. सभेच्या शेवटपर्यंत सदस्यांमध्ये याबाबत चर्चा सुरू होती.
छायाचित्र: सभेत सदस्य रमेश पाटील, संजय गरुड, प्रकाश साेमवंशी, अशाेक कांडेलकर यांच्यात सुरु असलेली खडाजंगी.