आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्तृत्व कला दिसायला सोपी पण अवगत करायला अवघड- द.मा. मिरासदार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलनात रविवारी सकाळी कवी प्रा. फ.मुं. शिंदे यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार होती. परंतु त्यांच्या अनुपस्थितीत द.मा. मिरासदार यांची मुलाखत नितीन केळकर यांनी घेतली.

केळकर यांनी वेगवेगळ्या प्रश्‍नांच्या माध्यमातून मिरासदार यांच्यातील विनोदी साहित्यिक विद्यार्थ्यांसमोर उलगडला. मिरासदार यांनी जीवनात आलेले अनेक विनोदी किस्से विद्यार्थी साहित्यिकांना ऐकवले आणि सभागृहाला खद्खदून हसविले.

याच विनोदी प्रसंगातून साहित्य निर्माण केले हे सांगताना मिरासदार म्हणाले की, विनोदी लेखक होण्यासाठी पंढरपूर येथील वास्तव्य कारणीभूत ठरले. पंढरपूर म्हणजे त्या वेळचे मोठे खेडेच. तेथे निवांतपणा असायचा. कुणाला विचारले कसे काय? यावर उत्तर असायचे निवांत. घरात वडिलांसह मामा, काका, आजोबा हे असल्याने आमचं वकिलांच घर होतं. आपापसात केलेल्या चर्चेतूनही अनेक विनोदी प्रसंग निर्माण व्हायचे. त्यामुळेही विनोदी साहित्य निर्माण करण्यास मदत झाली. पण मला वकिली करावीशी वाटली नाही. वडिलांनीही सांगितले की वकिलीत काही मजा नाही. मला लेखनाची आवड असल्याने तीन वष्रे मी पुण्यात पत्रकारिता केली. तेथील आर्थिक परिस्थिती पाहता पंढरपुरात प्राध्यापक म्हणून काम करत असताना साहित्य लेखन करीत राहिलो.


‘चि.विं.’चे विनोद नारदाच्या कळीप्रमाणे
चिंतामण जोशी, आचार्य अत्रे यांच्या विनोदाची जातच वेगळी होती. चिंतामण जोशी यांचा विनोद कुणालाही न दुखवणारा आणि निखळ हसवणारा असायचा. पुराणातील नारदाच्या कळीप्रमाणे असावा. तोच विनोद चि.वि. यांचा असायचा. रामायणातील कथांवरही त्यांनी खूप विनोदी पुस्तक लिहिले आहे. मात्र, त्यांच्याकडे वक्तृत्व गुण नसल्यामुळे त्याचे विनोदी लिखाण समाजातील सर्व घटकांपर्यंत गेले नाही, अशी खंतही मिरासदार यांनी व्यक्त केली.



अत्रेंच्या व्यक्तिमत्त्वावरही प्रकाश
अत्रे संतापले म्हणजे कुणाच्या बापाचे नाही. जो समोर येईल त्याच्यावर टीकास्त्र सोडण्यात ते कधीही घाबरले नाही. त्यांचे विनोदही खोचक आहेत. मिरासदार यांनी अत्रेंचेही अनुभव सभागृहासमोर ठेवले. चित्रपटांची पटकथा, संवाद लेखनात लेखकाला फारसे स्वातंत्र्य नाही. दिग्दर्शक निर्माता सांगेल तसे करावे लागते. या क्षेत्रातील गंमतीदार अनुभव त्यांनी या वेळी सांगितले.


सावरकरांच्या आवाजाची नक्कल
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा मिरासदार यांच्यावर प्रभाव असल्याचे दिसून आले. विनायक सावरकर यांनी मुंबईच्या पहिल्या साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषण केले. त्या वेळी मिरासदार लहान होते. पण त्यांच्या एकूण व्यक्तिरेखेवरून ते कसे बोलले असतील याचे हुबेहुब त्यांच्या भाषणातील त्यांच्याच आवाजात काही ओळी मिरासदार यांनी सादर केल्या.