आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Other Regional Cattle Straying In Chopada Taluka

चोपडा तालुक्यात परप्रांतातील गुरांच्या चराईबंदीच्या आदेशाचे होतेय उल्लंघन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा - टंचाई लक्षात घेता स्थानिक गुरांना कायम चारा मिळावा, म्हणून परप्रांतातील गुरांना जिल्ह्यात चराईबंदीचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढले आहेत. परंतु या आदेशाचे उल्लंघन चोपडा तालुक्यात होत आहे. अनेक ठिकाणच्या जंगलामध्ये काठेवाडी, परप्रांतातील व्यावसायिकांची गुरे चरताना दिसतात.

चोपडा तालुक्यात सध्या चाराटंचाईची फारसी स्थिती नाही. परंतु आगामी काळात ही समस्या भेडसावू शकते. त्यामुळे स्थानिक गुरांसाठी चारा राखून ठेवणे गरजेच आहे. ही परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकार्‍यांनी परप्रांतातील गुरांना जिल्ह्यातील जंगलांमध्ये चराईबंदीचे आदेश काढले आहेत. परंतु तालुक्यातील अनेक ठिकाणी ग्रामपंचायत किंवा पीक संरक्षण संस्थांतर्फे या आदेशाची पायमल्ली होतांना दिसत आहे. परप्रांतातील पशुपालकांच्या गुरांना जंगल चराईसाठी परस्पर विक्री होत आहे. त्यामुळे ी परप्रांतीय व स्थानिक पशुपालकांमध्ये वाद निर्माण होत आहेत.

वनपरीक्षेत्रातही शिरकाव
वनपरीक्षेत्रात गुरांना चराईची बंदी असताना वडती, विष्णापूर, वर्डी, मालपूर, बोरअंजटी, वैजापूरच्या तेल्या घाटात काठेवाड्यांची गुरे दिसत आहेत. त्याकडे मात्र वनपरीक्षेत्र अधिकारी, बीट हवालदाराचे दुर्लक्ष होत आहे. तसेच मराठे, हातेड, लासूर, माचले, अडावद, मितावली, धानोरा, चहार्डी, गणपूर, भवाळे शिवारात तसेच सातपुडा परिसरात परप्रांतातील पशुपालकांचे वास्तव्य दिसत आहे.


वडती, विष्णापूर, वर्डी परिसरातील जंगलामध्ये परप्रांतीय गुरे मोठय़ा प्रमाणात दिसत आहेत. वडती पीक संरक्षण सोसायटीने गुरांच्या चराईसाठी जंगल विकलेले नाही. तरीही परप्रांतातील व्यावसायिकांनी अतिक्रमण करून गुरांना चराईसाठी रानात मोकळे सोडले आहे. त्यामुळे स्थानिक गुरांना पुरेसा चारा उपलब्ध होत नाही. परप्रांतीय पशुपालकांना स्थानिक जंगलातून बाहेर काढण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. जयराम कोळी, चेअरमन, पीकसंरक्षण संस्था, वडती

पीक संरक्षण सोसायट्यांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. सोसायट्या चालवण्यासाठी काठेवाड्यांना जंगल विकावे लागते. त्यातून सोसायट्यांना अर्थसाहाय्य मिळते. प्रशासनाने चराईबंदीचा आदेश पारीत केला आहे. जंगल चराईसाठी विक्री न केल्यास सोसायट्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. याप्रकरणी प्रशासनाने सुवर्णमध्य साधावा. जेणेकरून स्थानिक पशुधनही अडचणीत येणार नाही. देवेंद्र सोनवणे, तालुका प्रमुख, शिवसेना


अमळनेर येथेही वाद
बाहेरील गुरांमुळे चाराटंचाईत अधिक भर पडत असल्याने दुष्काळी स्थितीत स्थानिक पशुधन संकटात आले आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार परप्रांतातील गुरांना चराईबंदी आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील जंगलांमधून काठेवाडींची हकालपट्टी झालेली आहे. याच प्रकारे चोपडा तालुक्यातही अंमलबजावणीची मागणी होत आहे.