आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावरून लाखोंची ओव्हरलोडिंग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - भुसावळ ते रायपूर आणि थेट बिलासपूरपर्यंत बेकायदेशीरपणे क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणार्‍या ट्रान्सपोर्ट एजंटचे जाळे निर्माण झाले आहे. जळगाव उपप्रादेशिक कार्यालयाच्या कृपाशीर्वादाने ओव्हरलोडिंगचे कार्ड बनवून महिन्याकाठी लाखो रुपयांची गोलमाल होते.
ओव्हरलोड माल घेऊन धावणार्‍या वाहनाला एका जिल्ह्यातून सुरळीत बाहेर काढण्यासाठी पाच हजार रुपयांचे स्टीकर कार्ड घ्यावे लागते. भुसावळ शहर आणि परिसरात अशा एजंटचे रॅकेट सक्रिय आहे. जे ट्रकचालक या एजंटच्या दबावाला जुमानत नाहीत. त्यांना मुद्दाम त्रास दिला जातो. तरीही आरटीओ विभागाचा फ्लाइंग स्कॉड बघ्याची भूमिका घेत असल्याने वरिष्ठ पातळीवर पाणी मुरल्याची चर्चा आहे.

शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील ट्रान्सपोर्ट एजंट आणि जळगावसह परिसरातील पाच जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन विभागातील काही अधिकार्‍यांच्या संगनमताने जळगाव-भुसावळ येथून रायपूर, बिलासपूर आणि थेट छत्तीसगडपर्यंत क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेल्या मालट्रक सर्रासपणे धावतात. भुसावळ या व्यवसायाचे केंद्रस्थान ठरू पाहत आहे. शहरातील एका प्रसिद्ध ट्रान्सपोर्ट एजन्सी चालकाचे जळगाव, अकोला आणि अमरावती, बुलडाणा, अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयातील अधिकार्‍यांशी अतिशय स्नेहाचे संबंध आहेत. याच पंटरच्या ट्रान्सपोर्टमधून क्षमतेपेक्षा जास्त माल भरून धावणार्‍या वाहनांना बेकायदेशीर ओव्हरलोडिंग स्टीकरची विक्री होते. आरटीओचे पंटर एका जिल्ह्याची हद्द ओलांडून देण्यासाठी ट्रकमालकांकडून प्रतिजिल्हा पाच हजार रुपये वसूल करतात, अशी माहिती पुढे येत आहे.

भुसावळात बिलासपूर आणि रायपूर येथून मोठय़ा प्रमाणात कोळशाची आयात केली जाते. तर भुसावळ आणि जळगावच्या हद्दीतून रासायनिक खते, साखर, दाळ आणि कांद्याची वाहतूक होते. त्यामुळे दरमहा होणारी उलाढाल एखाद्या मोठय़ा उद्योगालाही लाजवणारी आहे. विशेषत: हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील अवजड वाहने रावेर किंवा मुक्ताईनगरच्या चौफुलीकडून बर्‍हाणपूर मार्गे तर छत्तीसगडकडे जाणारी वाहने देवरी (जि.नागपूर) येथून जातात. त्या अनुषंगाने धावणारी ओव्हरलोड वाहने आणि प्रतिवाहनाकडून एका जिल्ह्याची हद्द ओलांडण्यासाठी वसूल होणारे पाच हजार रुपये, या प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणे गरजेचे आहे. प्राप्त तक्रारीनुसार ‘दिव्य मराठी’च्या टीमने शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर काही ट्रकचालकांना विचारणा केली. या वेळी काहींनी तर एजंटकडून पैसे देऊन घेतलेले स्टीकर कार्ड दाखवले. शिवाय या कार्डामुळे कोणताही आरटीओ अडवत नसल्याची बतावणी त्यांनी केली.
मोबाइलद्वारे पाठवितात संदेश

ओव्हरलोड वाहनांना स्टिकर कार्ड दिल्यानंतर त्या वाहनांचा क्रमांक, मोबाइल एसएमएसद्वारे संबंधित सर्व जिल्ह्यांच्या अधिकार्‍यांना पाठविला जातो. महिन्याच्या 31 तारखेपर्यंत या गाडीतून कितीही ओव्हरलोड वाहतूक झाली तरी संबंधित जिल्ह्यातील आरटीओ कारवाई करीत नाहीत. यानंतर कार्ड घेतलेल्या वाहन क्रमांकांची यादी पुन्हा दर महिन्याच्या सुरुवातीलाच आरटीओकडे जाते. एका जिल्ह्याची हद्द ओलांडण्यासाठी कार्डची किंमत सरासरी पाच हजार रुपये असल्याने लाखो रुपयांची उलाढाल होते. यातून अधिकारी व पंटर होताहेत मालामाल.
एजंटकडून टायरही उधारीत - ओव्हरलोड माल भरताना गाडीचे टायर लवकर निकामी होते. यामुळे अनेक ट्रकचालकांजवळ ऐनवेळी टायर बदलण्यासाठी पैसेही नसतात. अशांची निकड भागवण्यासाठी आरटीओचे पंटर तत्पर असतात. भुसावळातील एक पंटर तर केवळ ओव्हरलोड वाहतूक करा आणि टायरही उधारीत घेऊन जा, असेच सांगतो. अनेक ट्रकचालकांना या पंटरने टायर उधारीत दिले आहेत. त्यामुळे ट्रकचालकांकडून ओव्हरलोडिंगही होते आणि पंटरला एक नवीन व्यवसायदेखील मिळाला आहे. उधारीच्या या व्यवसायात दोन टक्केदराने व्याजही वसूल होते.
पंटरांवर कारवाई होईल - राज्यात काही ठिकाणी असे प्रकार चालतात, याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शासनाने गंभीरपणे कृती केली होती. लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनीही कारवाई केली होती. दोषी आढळलेल्या उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकार्‍यांचे निलंबनही झाले आहे. परिसरातील पंटरांवर आमचे खास लक्ष असेल. नियमबाह्य पद्धतीने स्टिकर कार्ड देणारे पंटर गजाआड जातील. गुलाबराव देवकर, परिवहन राज्यमंत्री, महाराष्ट्र
ठेटीकडून आर्थिक शोषण - शहरातील मंजितसिंग हरिसिंग ठेटी हे ट्रकचालकांना ओव्हरलोडिंगचे स्टिकर विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. आरटीओ जळगावसह त्यांचे देशभरातील आरटीओंशी आर्थिक संबंध आहेत. वाहनधारकांची लूट होत असल्याने माझ्यासारख्या ट्रक व्यवसाय करणार्‍यांचे शोषण होत आहे. हे शोषण थांबविण्यासाठी आपण राष्ट्रपतींपासून जिल्हाधिकार्‍यांपर्यंत तक्रार केली आहे. अर्जुन खरारे, तक्रारकर्ता ट्रकमालक, भुसावळ