आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओव्हरब्रीजला पडले तडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - चौपदरीकरणासाठी भूसंपादन वेळेत पूर्ण होत नसल्याने जळगाव ते अमरावती दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम तब्बल दोन वर्षांपासून रखडले आहे. प्रामुख्याने भुसावळ शहर आणि तालुक्यातून जाणारा महामार्ग अक्षरश: खिळखिळा झाला आहे. नाहाटा चौफुली ते नवोदय विद्यालयादरम्यान आयटीआयजवळ रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. महामार्ग चौपदरीकरणात या रेल्वे पुलाचेही विस्तारिकरण होणार आहे. मात्र, हे काम रखडल्याने पुलाच्या मध्यभागी मार्गाला तडे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या पुलाच्या मेंटनन्सचे काम होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे हस्तांतरण 1 एप्रिल 2013 रोजी महामार्ग प्राधिकरणाकडे करण्यात आले. महामार्ग प्राधिकरणाकडून मात्र कोणत्याही प्रकारची डागडुजी होत नसल्याने या तड्यांचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे. महामार्गावरून दररोज हजारो अवजड वाहने ये-जा करतात. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणापूर्वी रस्त्याची डागडुजी होत नसल्याने वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. मात्र, अपघात टाळण्यासाठी किमान ओव्हरब्रीजवरील रस्त्याला पडलेल्या भेगांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे.

ब्रीज झाला कमकुवत
सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राधिकरणाकडे रस्ता वर्ग केल्यानंतर एकदाही ओव्हरब्रीजचे मेंटनन्स झालेले नाही. यामुळे अवजड वाहन ओव्हरब्रीजवरून जात असताना ‘व्हायब्रेशन’ होण्याचे प्रक ारही वाढले आहेत. ब्रीजच्या खालील भागातून रेल्वेगाड्या दर पाच ते सात मिनिटांच्या अंतराने धावत असतात. तर महामार्गावरून रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. यादरम्यान अपघात झाल्यास जीवितहानी होऊ शकते. यामुळे पुलाची डागडुजी गरजेची आहे.

यापूर्वीही भगदाड
राष्ट्रीय महामार्गावरील याच रेल्वे ओव्हरब्रीजला गेल्या वर्षीही भलेमोठे भगदाड पडले होते. या भगदाडातून थेट पुलाखालील रेल्वे लाइनही स्पष्टपणे दिसत होती. त्यामुळे छोट्या वाहनांचे भगदाडात चाक अडकून अपघात होण्याची शक्यता वाढली होती. त्या वेळी ‘दिव्य मराठी’ने पाठपुरावा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली होती. त्यानंतर तत्काळ दुरु स्तीचे काम पूर्ण झाल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला होता. आताही अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
साइडपट्ट्यांवर चिखल
भुसावळ तालुक्यातील साकेगाव ते वरणगाव दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या साइडपट्ट्यांची स्थितीही विदारक झाली आहे. साइडपट्ट्यांवर गेल्या पावसाळ्यात मुरूम पसरवण्यात आला होता. यामुळे कधीकाळी टणक असलेल्या साइडपट्ट्या नरम झाल्या आहेत. रस्त्यावरून वाहन खाली उतरवल्यानंतर थेट चिखलात फसून अपघात होत आहेत. यामुळे किमान साइडपट्ट्यांवर खडी टाकून मजबुतीक रण आवश्यक आहे.

दिशादर्शक फलक नावालाच
महामार्गावर दिशादर्शक फलकांची स्थितीही बिकट आहे. अनेक ठिकाणचे फलक वाकले आहेत. यामुळे वाहनधारकांना आवश्यक असलेली माहिती मिळत नाही. वळण रस्ता, चौफुली, शाळांचा परिसर, याबाबत सूचना देणारे फलक महामार्गावर नाहीत. प्रामुख्याने भुसावळ, साकेगाव, वरणगाव याठिकाणी फलक लावणे आवश्यक आहे.
अधिकार्‍यांना देणार सूचना
रेल्वे ओव्हरब्रीजवर भेगा पडल्याच्या प्रकाराची माहिती महामार्ग प्राधिकरणाला नाही. महामार्ग डागडुजीसाठी निधीची मागणी केली आहे. निधी मिळाल्यानंतर सर्वच रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल. यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांना सूचना देऊन तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल. रस्त्यावरील भेगा बुजवण्याचे काम पंधरवड्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत.
यू. जे. चामरगोरे, कार्यकारी संचालक, महामार्ग प्राधिकरण