आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • P.K.Anna News In Marathi, Cooperative, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पी. के. अण्णा अनंतात विलीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार - सहकार, शिक्षणमहर्षी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार पी. के. अण्णा पाटील यांच्यावर शुक्रवारी शहादा तालुक्यातील लोणखेडाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुत्र दीपक पाटील यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला. या वेळी "पी. के. अण्णा अमर रहे'च्या घोषणा देण्यात आल्या.

बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना गुरुवारी पी. के. अण्णा पाटील यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव रात्री मुंबईहून शहाद्यात आणण्यात आले. त्यानंतर ते विद्याविहारमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. शनिवारी सकाळी पार्थिव सजवलेल्या रथात ठेवून विविध संस्थांमध्ये नेण्यात आले. सातपुडा सहकारी साखर कारखाना, वाल्मीकी विद्यालय, सातपुडा विद्यालयातून लोणखेड्याच्या प्रांगणात पार्थिव आणण्यात आले. तेथे फुलांनी सजवलेल्या मंचावर पार्थिव ठेवण्यात आले. या वेळी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची अंत्यदर्शनासाठी रीघ लागली होती.

खासदार रामदास आठवलेंचा शोक संदेश
रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी दूरध्वनीवरून शोकसंदेश व्यक्त केला. ते म्हणाले, ‘मी परिवहनमंत्री असताना पी. के. अण्णा पाटील हे महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी महामंडळाचे अध्यक्षपद सांभाळताना भ्रष्टाचारमुक्त प्रशासन चालवले. ते उत्तम प्रशासक होते,’ असेही ते म्हणाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पाठविलेल्या शोकसंदेशाचे वाचनही या वेळी करण्यात आले.