आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाेरट्यांनी धावत्या रेल्वेत लांबवले 65 हजारांचे दागिणे; पाचोरा-जळगाव रेल्वेतील प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव -  लग्न समारंभाच्या निमित्ताने पॅसेंजर गाडीने पाचोऱ्याहून जळगावला येणाऱ्या प्रवासी महिलेच्या पर्समधून सुमारे 65 हजार रूपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. जळगाव स्थानकावर शुक्रवारी सकाळी 9.10 वाजता हा प्रकार उघडकीस आला.
 
मूळचे गिरड (ता.पाचोरा) येथील व सध्या नोकरीच्या निमित्ताने कल्याण येथे राहणारे दीपक पाटील हे पत्नी ज्योती, दहा वर्षांची मुलगी दिव्यांका व दोन वर्षांचा मुलगा भूषण यांना घेऊन पाचोरा येथून जळगावला आले. दरम्यान रेल्वेगाडीतून उतरल्यानंतर ज्योती पाटील यांच्या पर्सची चेन उघडी असल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी पर्सची तपासणी केली. पर्समधील दोन डब्या गहाळ होत्या. या डब्यांमध्ये लहान मुलाचे सोन्याचे दागिने व दीपक पाटील यांच्या मयत आईंचे मंगळसूत्र होते. सुमारे सव्वादोन तोळ्याचे दागिने या दोन डब्यांमध्ये होते. चोरट्यांनी पर्सची चेन उघडून दागिने गहाळ केल्याची दीपक पाटील यांची खात्री झाली. त्यांनी पत्नीसह लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 स्थानकावर उडाला गोंधळ
 पाटील कुटुंबीयांसोबत घडलेला प्रकाराची इतर सहप्रवशांना माहिती मिळताच एकच गोंधळ उडाला. काहींनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्नही केला. धावत्या रेल्वेगाडीतून प्रवाशाचा मोबाइल हिसकावण्यामुळे दोन दिवसांपूर्वीच रेल्वेरुळावर पडून तरुणाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी पाटील कुटंुबीयांचे सोने चोरल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे प्रवासीदेखील संतापले होते.

 सोने खरेदीचाच होता विचार
 दीपक पाटील दोन दिवसापूर्वी ते गिरडला अाले होते. तेथून शुक्रवारी जळगावात पिंप्राळा येथे लग्न समारंभात ते आले. तत्पूर्वी त्यांनी सोबत आणलेले लहान मुलाचे दागिने व मयत आईचे मंगळसूत्र मोडून त्यात आणखी काही पैसे टाकून सोन्याचे दागिने खरेदी करण्याचे त्यांनी ठरवले होते. त्यानुसार रेल्वे स्थानकावरून ते सराफ बाजारातच जाणार होते. तत्पूर्वीच चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील सोने चोरल्याची घटना घडली.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...