आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थ्यांच्या पैशावर शिक्षकांची शाळेतच ओली पार्टी अन् धिंगाणा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोरा - जळगाव-पाचोरा मार्गावरील खेडगाव नंदीचे (ता. पाचोरा) येथील एस. बी.हायस्कूलमधील काही शिक्षकांनी आयोजित केलेल्या ओल्या पार्टीतील धिंगाण्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि. 27) एस. बी. हायस्कूलमध्ये रात्री 8 वाजता शाळेतील 12 शिक्षकांनी मटण व दारूची पार्टी आयोजित केली होती. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे (मार्कशीट) वाटप करताना प्रत्येक विद्यार्थ्याकडून 100 रुपये गोळा करून ही पार्टी आयोजित केली होती. अपेक्षेपेक्षा जास्त पैसे गोळा झाल्याने मटण, चिकन, अंडी, मांडे व धुंद होण्यासाठी इंग्लिश दारू पाचोर्‍याहून मागवण्यात आली. सायंकाळी मटण, चिकनची भाजी तयार केली. रात्री आठ वाजेपासून पार्टीला दारूच्या पेल्याने सुरुवात झाली.

या पार्टीतील शाळेचा शिपाई ज्ञानेश्वर न्हावी याला अधिक दारू पाजली गेल्याने तो बेधुंद झाला. पार्टीतील कुण्यातरी शिक्षकाने त्याला एकेरी शब्दात हाक मारली, याचा त्याला राग आला आणि रागाच्या भरात त्याने मटणाच्या भाजीचे भांडेच उलटून टाकल्यामुळे मद्यपी शिक्षक कमालीचे चिडले. यातच एकमेकास शिवीगाळ करत कपडे फाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली. जोरजोराने ओरडण्याचा प्रकार सुरू झाला. हा प्रकार गावातील सरपंचांना कळताच त्यांनी काही ग्रामस्थांसह शाळेला भेट दिली. समोरचे दृश्य पाहून तेदेखील स्तब्ध झाले. सरपंच, ग्रामस्थांना बघून शिक्षक पार्टी तशीच सोडून पळून गेले. त्यानंतर सरपंचांनी ज्या खोलीत पार्टीचे साहित्य अर्थात दारूच्या बाटल्या ठेवल्या होत्या त्या खोलीला कुलूप ठोकले.

शिक्षकांवर गुन्हा दाखल
विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन दारूच्या नशेत तर्र झालेल्या मुख्याध्यापकासह नऊ शिक्षकांना निलंबन केल्याशिवाय शाळेचे कुलूप उघडू देणार नसल्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. ज्ञानादानाचे कार्य होत असलेल्या पवित्र ठिकाणी शिक्षकांनी हे कृत्य केल्याने ग्रामपंचायतीतर्फे पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांनी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईचे संकेत दिले.