आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्याध्यापकांनीच केली पार्टी; शिपाई वाघ, न्हावी यांचा शिक्षणाधिकार्‍यांकडे जबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोरा/जळगाव - ‘मुख्याध्यापक एम.एफ. चव्हाण यांनीच ओल्या पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत दारूच्या नशेत हाणामारी झाल्याने प्रकरण चिघळले,’ असा धक्कादायक जबाब एस. बी. संघवी माध्यमिक शाळेतील शिपाई गोविंद वाघ, ज्ञानेश्वर न्हावी यांनी चौकशीसाठी आलेल्या शिक्षणाधिकार्‍यांकडे दिला. तर दोन्ही शिपायांमध्ये भांडण झाल्याने आम्ही जेवणाआधी निघून गेलो, असा बचाव मुख्याध्यापकांनी केला.

पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदी येथील संघवी माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकासह नऊ शिक्षकांनी 57 विद्यार्थ्यांकडून दहावीचे गुणपत्रक देताना प्रत्येकी 100 रुपये घेऊन शुक्रवारी रात्री शाळेतच ओली पार्टी केली होती. ‘दिव्य मराठी’ने हे प्रकरण उजेडात आणल्यानंतर शनिवारी पाचोरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील घटनास्थळी जाऊन शिक्षणाधिकार्‍यांना अहवाल दिला. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य ओळखत रविवारी सुटीच्या दिवशी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर खेडगाव नंदी येथे गेले. त्यांच्यासोबत उपशिक्षणाधिकारी एन.जी.खंडारे, गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, विस्तार अधिकारी किशोर वायकोळे होते.

या पथकाने खेडगाव नंदी येथील शाळेत जाऊन शिक्षकांनी पार्टी केलेले ठिकाण तपासले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक एम.एफ. चव्हाण, शिपाई गोविंद वाघ, ज्ञानेश्वर न्हावी, सरपंच तसेच शालेय समितीचे चेअरमन विजय संघवी यांचे घटनेप्रकरणी जबाब नोंदवून घेतले आहेत.

विद्यार्थ्यांकडून पैसेही घेतले : शिक्षणाधिकारी
शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासणार्‍या या घटनेबद्दल शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी या प्रकाराचा जाब मुख्याध्यापकांना विचारला. चौकशीत शाळेत पार्टी झाली, विद्यार्थ्यांकडून पैसेही घेतल्याचे सिद्ध झाले. यामुळे संस्थाचालकांना कारवाई करून सोमवारी अहवाल द्यावा, असे निर्देश आपण दिले असल्याचे शिक्षणाधिकार्‍यांनी सांगितले. संस्थाचालकांकडून अहवाल आल्यावर तो शिक्षण उपसंचालकांना पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.