आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर ‘पाडळसरे’चे काम सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर - पाडळसरे धरणक्षेत्रावर शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आमदार साहेबराव पाटील व जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या आमदार असलेल्या पाटील यांनी उपोषणाचे अस्त्र उपसल्याने मंत्र्यांसह अधिकारीही कामाला लागले अन् प्रत्यक्ष कामाला अधिवेशनापूर्वीच सुरुवात झाली. यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

आमदार साहेबराव पाटील यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी उपसलेल्या उपोषणास्त्राने प्रशासन खळबळून जागे झाले अन् प्रत्यक्ष त्या अस्त्राचा लाभ दिसून आला. विविध मागण्यांसदर्भात त्यांनी नगरविकास, बांधकाम, महसूल, ग्रामविकास, गृह, परिवहन या खात्यांबरोबर जलसंपदा, लघुसिंचन (जलसंधारण) या विभागांकडे केलेल्या पत्रव्यवहाराने व्यथित होऊन अखेर उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपोषण करणार असे जाहीर केल्याने सत्ताधारी पक्षातील सहयोगी सदस्य असलेल्या आमदारांच्या उपोषणामुळे सुस्त प्रशासन यंत्रणा कार्यान्वित झाली अन् त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. या कार्यक्रमास तापी पाटबंधारे अधीक्षक अभियंता व्ही.डी. पाटील, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण विभागाचे अधीक्षक अभियंता ए.एन.पवार, सहायक अभियंता ए.के. सूर्यवंशी, प्रांताधिकारी तुकाराम हुलवळे, हतनूर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे, तहसीलदार प्रमोद हिले, उपविभागीय अधिकारी आय.एम. सौदागर, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर.थोरात, गुणनियंत्रण विभागाचे आर.डी. खैरनार, विक्रांत पाटील, जयवंत पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, पाडळसर्‍याचे सरपंच भागवत पाटील, माजी सरपंच सचिन पाटील, वसंत पाटील यांच्यासह गावकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

पुनर्वसनाबाबत चर्चा
शुभारंभानंतर बैठकीत पाडळसरे, सात्री, विटनेर, डांगरीच्या पुनवर्सनाबाबत चर्चा झाली. यावेळी प्रकल्पापेक्षा जादा निधी पुनर्वसनावर खर्च होत असून त्यात जी दिरंगाई होते, याबाबत आमदारांनी नाराजी व्यक्त करत हे धोरण बदलण्याची मागणी केली. पुनर्वसित गावे जाहीर झाल्यापासून तेथे मूलभूत सुविधाही मंजूर होत नाहीत व पुनर्वसनही होत नाही, यामुळे ते सुविधांपासून वंचित राहतात, असे स्पष्ट केल्यानंतर यास गती देण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

मार्चपूर्वी अडणार पाणी
टेलीबेल्ट मशीनद्वारे तसेच मानवविरहित जलदगतीने काम होणार आहे. दिवसभरात पंधराशे थैल्यांचे सिमेंट कालवून माल तयार करून ते थेट जागेवर सिमेंट ओतणारे हे अत्याधुनिक मशीन आहे. यामुळे 2 टीएमसी पाणी अडणार असून त्याचा जलफुगवटा नांदेड गावापर्यंत जाणार आहे. त्यामुळे तापीनदीकाठासह इतर 35 गावे तसेच अमळनेर शहराची पाणीटंचाईची समस्या मिटणार आहे. 70 हजार क्षेत्राच्या जमिनीवरील पाणी उचलून सिंचन करता येईल, एवढे पाणी येथे साठेल. यापूर्वी पावसाळ्याअगोदर झालेले काम पावसामुळे बंद झाले होते. त्यावेळी 4 कोटी रुपये खर्च झाले तर त्यातील 36 कोटी रुपये आता शिल्लक आहेत.