आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- गरिबी काय असते याची कल्पना करणेही खूप दु:खदायी आहे. त्यामुळे आपण गरीब आहोत, असा शब्दही तोंडातून काढू नका. गरिबी दूर करण्यासाठी प्रचंड मेहनत करा, असा सल्ला वजा आवाहन छत्तीसगड राज्यातील राजनंदागाव येथील फुलबसनदेवी यादव यांनी जळगावच्या महिलांना केले. रोटरी क्लब आॅफ जळगाव सेंट्रलतर्फे रविवारी सायंकाळी पाच वाजता गंधे सभागृहात ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर पद्मश्री फुलबसनदेवी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलचे अध्यक्ष महेंद्र रायसोनी, सचिव डॉ.राहुल मयूर, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा डॉ.अस्मिता पाटील, महापौर राखी सोनवणे उपस्थित होत्या.
फुलबसंनदेवी यांनी महिलांना मार्गदर्शन करीत असताना स्वत:च्या खडतर जीवन प्रवासाचे चित्र उलगडून दाखवले. वयाच्या दहाव्या वर्षी लग्न आणि विसाव्या वर्षी चार मुलांची माता झालेल्या फुलबसनदेवी यांनी माहेर आणि सासर दोन्ही घरांमध्ये अठराविश्वे दारिद्र्यात राहत असतानाच बचतगट, समाजसेवेच्या माध्यमातून पद्मश्री पुरस्कार मिळवण्यापर्यंतची मजल मारली आहे. त्यांनी महिलांशी संवाद साधताना सांगितले की, मला शिकण्याची मोठी इच्छा होती. पण गरिबीमुळे शिकायला मिळाले नाही. वयाच्या दहाव्या वर्षी लग्न झाले. पतीकडे गेल्यानंतरही तीच परिस्थिती समोर आली. पती मालकाकडे गुरे चारण्याचे काम करीत होता. एकवेळेच्या जेवणाचेही खरे नव्हते. अशा परिस्थितीत मुले झाली. दीड वर्षाच्या लहान मुलीसह घरातील सर्वच जण तीन-चार दिवस उपाशी राहत असू. गावातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. आमचे तोंड पाहण्यासही कोणी तयार नव्हते, असे असताना मी गावात महिलांचा एक समूह गोळा करण्याचा संकल्प केला. यातून काहीतरी प्रगती होईल या आशेने कामाला लागलो. समूह तयार करीत असताना स्वत:पतीने त्यांना दररोज मारहाण केली. मात्र समाजसेवेची नशा असल्यामुळे देवानेही साथ दिली आणि अवघ्या 12 वर्षांत आम्ही मोठे यश प्राप्त केल्याचे फुलबसन यांनी सांगितले.
सायकलवर जाऊन केला प्रचार
फुलबसनदेवी यांनी गावात 2001 मध्ये एक महिला संघटना सुरू केली. गावातून प्रचंड विरोध झाला. त्यामुळे गावाची साफसफाई, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, शोषखड्डे तयार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकांमध्ये महिलांबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला. या महिलांनी सायकलीवरून शेजारपाजारच्या खेड्यांमध्ये जाऊन प्रचार केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.