आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pages Of Drought : Cattle Market Run For The Foods

दुष्‍काळाची पाने : पोटाच्या खळगीसाठी मांडला जित्राबाचा बाजार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव - जिथे तहानलेल्या ढेकळाला, हंबरणा-या कालवडीला अन् माळरानावर भटकणा-या पक्ष्यांना पाण्याचा थेंब हवा आहे; तिथे माणसाला काय संघर्ष करावा लागतोय? हे प्रत्यक्ष अनुभवलं. ‘टँकर आला....’ हे शब्द कानावर आदळताच हातातला घास ताटात ठेवून पाणी भरण्यासाठी झेपावलेल्या आया-बहिणींची धडपड पाहिली. खान्देशच्या नकाशावर देवळांचं गाव अशी ओळख जपणारं नगरदेवळा आता पाणीटंचाईशी सर्वाधिक काळ झुंजणारं गाव या अर्थानं ओळखलं जात आहे.


खरे तर कापूस व गहू हे इथलं मुख्य पीक; परंतु पाण्याअभावी रब्बीचा हंगामच शेतक-यांनी घेतला नाही, असं सांगत प्रभाकर पाटील म्हणाले, इथली दोनशे हेक्टर शेतजमीन ओस पडली आहे. रवींद्र जगन्नाथ पवार यांनी आपल्या गायी दान केल्या. ते सांगत होते, ‘विष खावाले बी आमनापास पैसा नही शे. लिंबूनी बाग करपली. अहो एक नई तर चक्क 10 गायी गो शाळेले दान करी दिन्या’. चा-यासाठी पैसा नाही अन् घरात चूल पेटविणे कठीण झालेले अशा परिस्थितीत बैल विक्रीतून मिळालेल्या पैशातून दोन महिने प्रपंच चालू शकेल या आशेने संतोष भालचंद्र महाजन यांनी 48 हजारांत घेतलेली बैलजोडी फक्त 19 हजारांत विकली. 40 हजारांत घेतलेली म्हैस फक्त 18 - 20 हजारांत विकणारे शेतकरीही भेटले. 30 हजारांत घेतलेली गाय दोन शेतक-यांनी तर सात हजारांत विकली. चाराच नाही तर खुंट्याला बांधून जनावरांना पोसायचे कसे? हा प्रश्न शेतक-यांना छळतो आहे. बकरीला कुणी दारात उभे करेल तर नशीबच समजायचे. दूध देणा-या चार बक-या हाजी इस्माईल यांनी प्रत्येकी दोन हजारांत विकल्या. प्रशासनावर तोंडसुख घेत राजेंद्र पवार म्हणाले,‘शासनानं दुष्काळ जाहीर करं...तरीबी तलाठीआप्पा शेतसारा लेवाले कटकट करस...अन् चारा छावण्या लावाले बोंब शे...’ एकंदरीत दुष्काळामुळे गावक-यांचे जीणेदेखील कसे महाग होत चालले आहे, त्याची ही एक झलक.


जसा टंचाईचा दाह वाढतोय् तशी इथल्या रहिवाशांची दिनचर्याही बदलत चाललीय्. आत्माराम पाटील म्हणाले, पहाटेस ऐकायला येणारी पाखरांची गाणी अन् देवळांतल्या घंटांचा मंजूळ नाद पाण्याच्या धबडग्यात हरवलाय्. स्व. विठ्ठल मिस्तरींनी सुरू केलेली प्रभातफेरी बंदच झाली आहे. शेतावर जाण्याची वेळदेखील बदललीय्. ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना पाण्यासाठी टॅँकरच्या मागे पळापळ करावी लागतेय्, टॅँकर आपल्या गल्लीत येणार असल्याची कुणकुण लागताच ‘सर घरमा पाणी येणार शे जाऊ का...?’ असं शिक्षकांना केलं जाणारं आर्जव नित्याचंच झालंय्. इथल्या परदेशी आणि पोस्ट गल्लीत चक्कर मारली तेव्हा दोन महिलांमध्ये ‘मी आधी’ वरून सुरू झालेला संवाद विसंवादात केव्हा बदलला हे त्यांच्या लक्षात आले नाही अन् कडाक्याचं भांडण सुरू झालं. ‘मना गुंडा भरी लीऊ दे... घरमा पसारा पडेल शे...’ असं एकीचं म्हणणं तर दुसरी म्हणाली, ‘ओ माय मना नवराले कामले जावाले टाइम हुयी राहिला, तुनाच घरमा पसारा शेका...आमले काही कामे नईत का...’ यानंतर दोघी भांडत राहिल्या; तोवर इतरांनी भराभर पाणी वाहून नेलं. एक काळ असा होता की, पाण्याला फारसं मोल नव्हतं; परंतु दुधाला होतं. आता इथल्या रहिवाशांना दुधाच्या बरोबरीनेच पाणी घ्यावे लागतेय्. दुधाचा भाव प्रतिलिटर 38 ते 40 रुपये आहे तर पाण्याचा 35 लिटरचा बॅरल याच किमतीत मिळतो. पिण्यासाठी दररोज एक बॅरल लागतो. पाच हजार लिटरचे एक टँकर 800 रुपयंत मिळतेय्. नगरदेवळेकर पाण्यावर दररोज 70 हजार 400 रुपये खर्च करत आहेत.


शेतात मजुरी मिळत नाही, शासनाच्या रोजगार हमी योजनेचाही ठिकाणा नाही. त्यामुळे इथल्या 15 कुटुंबांनी पोटाची खळगी भरण्यासाठी सूरत, जामनगर, मुंबई गाठली. 20 कुटुंब प्रमुख पत्नी व मुलांना गावातच ठेवून परगावी रोजगारासाठी गेले, तर शंभरेक जण जळगाव, पाचोरा येथे दररोज कामानिमित्ताने ये-जा करतात. स्थलांतर करणा-यांमध्ये मजूर अधिक आहेत. स्थलांतरित कुटुंब कोसो दूर गेले असले तरी त्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. कधी एकदा दमदार पाऊस सुरू होतो अन् ‘गड्या आपला गाव बरा’ म्हणत परतीच्या मार्गाला लागतो यासाठी ते अधीर झाले आहेत. कवी गो. शि.म्हसकर यांची ही चारोळी नगरदेवळ्यातीलच नव्हे, तर महाराष्‍ट्रातील सर्वात्मक दुष्काळाचे चित्रण करण्यात पुरेशी बोलकी ठरते.


दुष्काळाने पोखरले,
बळीराजाचे काळीज...
विस्तवाच्या हाती गेले,
सा-या आनंदाचे बीज...
देवळांचे गाव नगरदेवळा
देवळांचे गाव असलेल्या या नगरदेवळ्यात हनुमानाचीच 40 मंदिरे आहेत, तर एकूण 54 धार्मिक स्थळे आहेत. श्रीमंत बाळासाहेब
के. एस. पवार यांची येथे जहागिरी होती. मराठवाडा व खान्देशच्या सीमेवर असल्याने इथल्या बाजारपेठेशी 50 गावांचा संपर्क येतो.
गाव : नगरदेवळा (जि.जळगाव)
लोकसंख्या : 35 हजार
अंतर : जळगावपासून
70 किलोमीटर
वैशिष्ट्य : देवळांचे गाव
प्रमुख पीक : कापूस, गहू
नाही पाणी, नाही चारा; नेत्री आसवांच्या धारा
70,400 दररोजचा पाण्यासाठी खर्च
45 दिवसांआड नळाला पाणी
22 खासगी टँकर, दररोज 4 फे-या
800 रुपयांत मिळतो
5000 लिटरचा टॅँकर
30 आंब्याच्या बागांना पाण्याची आस
1500 जनावरे शेतक-यांनी विकली.