आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panchayat Committee Officer Arrested In The Case Of Bribe

चाळीसगावात पंचायत समितीचा अधिकारी लाच घेताना अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव - महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर मंजुरीसाठी तीन हजाराची लाच स्वीकारणारा पंचायत समितीचा कक्ष अधिकारी साहिल इकबाल खान (वय 57, रा.पवारवाडी, चाळीसगाव) यास नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. दि.22 रोजी दुपारी एक वाजता झालेल्या या कारवाईने कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली.

करगाव येथील विलास साहेबराव राठोड यांनी विहीर मंजुरीसाठी शिफारस पत्रासह प्रस्ताव दाखल केला होता. यासाठी त्यांनी कक्ष अधिकारी साहिल इकबाल खान यांच्याकडे अनेकवेळा चौकशी केली. विहीर मंजुरीसाठी तीन हजार रुपये लाच खान यांनी मागितली. राठोड यांनी याबाबतची तक्रार नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे केली. दि.22 रोजी दुपारी एक वाजता पंचायत समिती कार्यालयाबाहेर असलेल्या पोलिस कवायत मैदानाजवळ सापळा रचण्यात आला. राठोड यांनी 100 रुपयांचे तीन बंडल खान यांच्याकडे दिले. दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खान यांच्यावर झडप घातली. पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार, कॉन्स्टेबल गणेश रहिरे, पी.व्ही. कचरे यांनी ही कारवाई केली. खान यांना तातडीने पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले. त्यांचा जबाब घेण्यात येत होता तेव्हा पोलिस स्टेशनबाहेर गर्दी जमली होती. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. खान यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


निवृत्तीपूर्वी ‘धक्का’
साहिल खान हे तीन महिन्यांनी निवृत्त होणार होते. निवृत्तीपूर्वीच त्यांना या कारवाईला सामोरे जावे लागले. विहीर मंजुरीसाठी लाच मागणे त्यांच्यासाठी निवृत्तीपूर्वी ‘दे धक्का ठरला’.


चौकशी व्हावी
रोजगार हमी योजनेतून विहीर मंजुरीचे प्रस्ताव आल्यावर लाभार्थीकडून आर्थिक लाभ मिळविण्यासाठी एजंटही सक्रिय झाले आहेत. अधिकार्‍यांपासून काही राजकीय पदाधिकार्‍यांपर्यंत साखळीद्वारे एजंट आपले हात ओले करीत असतात खान यांना अटक झाली असली तरी बडा मासा मात्र अद्याप मोकाट असल्याची चर्चा पंचायत समिती कार्यालयाबाहेर सुरू होती. विहीर वाटप ज्या पद्धतीने होत आहे, त्याची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.


नोटा तोंडात टाकल्या
लाचलुचपत विभागाच्या पथकाने खान यांच्यावर झडप घालताच त्यांनी हातातील नोटा तोंडात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अधिकार्‍यांनी त्यांचे हात धरत प्रतिकार केला. खान यांना चांगलाच घाम फुटला होता