आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panchayat Raj News In Marathi, Dhule Municipal Corporation, Divya Marathi

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील परस्परविरोधी सत्तांमुळे वाढतोय गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकाची तर मतदारसंघांवर दुसर्‍याच नेत्यांचे वर्चस्व असल्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांपुढेही संकट निर्माण झाले आहे. एकाच्या पारड्यात एका ठिकाणी काहीतरी जास्त पडले तर दुसर्‍या ठिकाणी मात्र त्याच्यावर मात खायची वेळ येईल, अशी द्विधावस्था झाली आहे. आघाडी आणि युतीची ही कोंडी तिसर्‍या उमेदवाराने जोर लावल्यास फुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात दोन महापालिका आणि तीन नगरपालिकांचा समावेश आहे. त्यात धुळे आणि मालेगाव या महापालिका तर दोंडाईचा, शिंदखेडा आणि सटाणा या नगरपालिका आहेत. या संस्थांवर सध्यातरी कॉँग्रेस आघाडीची सत्ता आहे. मात्र यातील नगरपालिकांच्या सत्तेला बराच कालावधी उलटला आहे. त्यामुळे संबंधित पालिकांमध्ये सत्ताधार्‍यांची र्मजी चालेलच याची शक्यता उरलेली नाही. तर या पालिका ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये आहेत, त्यात विरोधकांची म्हणजे युतीची सत्ता आहे. त्यातच पंचायत समित्या, बाजार समित्या, शेतकी संघ, दूध संघ यावर त्या-त्या मतदारसंघातील आमदारांनी वर्चस्व मिळविले आहे. याचा थेट परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो.
मालेगाव येथे गट-तट
मालेगाव महापालिकेत कॉँग्रेसची सत्ता असली तरी त्यातही बरेच गट-तट आहेत. रशीद शेख यांचा प्रभाव मौलाना मुफ्ती कधी कमी करतील, हे सांगता येत नाही. निहाल अहमद व रशीद शेख यांच्यासारख्या दिग्गज राजकारण्यांना बाजूला बसवून मौलानांनी मालेगावची सत्ता सांभाळली होती. मालेगाव शहरचा हा प्रभाव असताना मालेगाव बाह्य भागात शिवसेनेच्या आमदाराचे वर्चस्व आहे. दादा भुसे यांनी पकड ढिली होऊ दिलेली नाही. त्यामुळे मालेगाव ग्रामीण झुंजवायला लावणार आहे.
शिंदखेडा येथे उठाठेवी जास्त
शिंदखेडा मतदारसंघाचा विचार केला तर भाजपच्या आमदाराचा तालुक्यावर प्रभाव आहे. पंचायत समितीसह इतर संस्था व शिंदखेडा नगरपालिकाही आमदाराच्या हाती आहे. मात्र, दोंडाईचा नगरपालिका राष्ट्रवादीकडे आहे. नगरपालिकेच्या भरवशावर राहणार्‍या कॉँग्रेसला तालुक्यात मात्र, बरेच झुंजावे लागणार आहे. पण सध्यातरी दोंडाईचा नगरपालिकेच्या सत्ताधार्‍यांचा भाव अचानक वधारला आहे. मात्र, दोंडाईचातील परिस्थिती बरीच इकडे-तिकडे होताना दिसतेय.
धुळे येथे विचित्र स्थिती
धुळे महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र, आमदार लोकसंग्राम पक्षाचे आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सत्तेवर अवलंबून राहून राजकीय समीकरणे जुळविणार्‍यांना याचा विचार करावाच लागतो. कारण आमदारही मुळात संघ विचारांचे आहेत. त्याचवेळी धुळे ग्रामीण मतदारसंघावरही शिवसेनेचे आमदार आहेत. पंचायत समिती व तालुक्यातील इतर संस्थांवरही त्यांचा प्रभाव आहे. कॉँग्रेसच्या विरोधात इतर असे चित्र या मतदारसंघात आहे.
महापालिका, नगरपालिकेमध्ये आघाडीचा तर मतदारसंघांवर युतीच्या वरचष्म्याने उमेदवारांचे झालेय हलते मनोरे
बागलाण संमिश्र
बागलाण भागात संमिश्र वारे वाहत आहेत. कॉँग्रेस आघाडीच्या गडाला युतीने बर्‍याच ठिकाणी खिंडार पाडून ठेवले आहे. त्यामुळे शहरात एक स्थिती दिसते तर त्याचवेळी ग्रामीण भागात मात्र दुसरीच स्थिती तयार होत आहे. पालिकेवर एकाची तर मतदारसंघावर दुसर्‍याची सत्ता लोकसभेच्या उमेदवारांना त्रस्त करून सोडणारी आहे.