आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोड्यांच्या शर्यतीत ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांचा शेरा प्रथम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार - डोळ्यांचे पारणे फेडणा-या घोड्यांच्या शर्यतीत राज्याच्या ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या शेरा नामक घोड्याने प्रथम तर परभणीचे महादू काळे यांचा तुफान नामक घोड्याने द्वितीय क्रमांक मिळविला.

सारंगखेडा येथील घोडे बाजाराला तीनशे वर्षांची परंपरा असून, या बाजाराला व्यापक प्रसिद्धी मिळावी, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून अश्व शर्यत घेण्यात येते. त्यानुसार मंगळवारी घोड्यांची धावणे व चाल स्पर्धा घेण्यात आली. दुपारी तीन वाजेला शर्यतीला प्रारंभ झाला. यात १८ घोड्यांनी सहभाग घेतला. शेरा, रॉकेट, तुफान, राजा व काजल या घोड्यांमध्ये अंतिम स्पर्धा झाली. स्पर्धेत मंत्री पंकजा मुंडे यांच्या शेरा नामक घोड्याने प्रथम क्रमांक मिळविला. चाल स्पर्धेत अनुक्रमे शकीलभाईंचा राजा, अमळनेरच्या अनिल मास्तर यांचा रॉकेट तर परळीचा पंकजा मुंडे यांच्या शेरा घोड्याने यश मिळविले. विजेत्यांना जिल्हा परिषदेचे सदस्य जयपालसिंह रावल यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. भूपेश गुजराती, साहेबराव चव्हाण, सतीश चोपडे, नीलेश मास्तर यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.