आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्यातील दोन दिवस सुट्यांना पालकांचा विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विद्यार्थ्यांना एक दिवस रविवारची सुटी पुरेशी आहे. आठवड्यातून दोन दिवस सुटी मिळाल्यास मुलांचे खेळण्याचे प्रमाण वाढून अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. पाच दिवसांत शिक्षकांकडून अभ्यासक्रमाचे नियोजन केले जाईल, परंतु घाईने घेतेलल्या अभ्यासामुळे गुणवत्तेवर परिणाम होईल. यामुळे शाळांना ‘फाइव्ह डे वीक’ नको, अशा प्रतिक्रिया प्राथमिक, माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केल्या आहेत. अद्याप या संबंधीचा सुधारित शासन निर्णय निर्गमित झाला नसला तरी, याबाबत शिक्षक, विद्यार्थी पालकांत चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर ‘दिव्य मराठी’ने थेट पालक, विद्यार्थ्यांशी संपर्क साधून मते जाणून घेतली.

प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांना शनिवार रविवारी सुटी देण्याबाबत शासकीयस्तरावर खल सुरू झाला आहे. शाळांनी आरटीई कायद्यानुसार अध्यापनाच्या तासिका पूर्ण करण्याची तयारी दर्शवल्यास पाच दिवसांच्या कामकाजाची परवानगी दिली जाईल, अशा सूचना मुंबई विभागीय शिक्षण संचालकांना दिल्या आहेत. पहिली ते पाचवीसाठी अध्यापनाचे २०० तर, सहावी ते आठवीसाठी २२० दिवस निश्चित केले आहेत. एप्रिल २०११ च्या अध्यादेशानुसार शाळांनी अध्यापनाचे तास पूर्ण केल्यास त्याना पाच दिवस शाळेची परवानगी दिली जाऊ शकते, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

सुटीचा दिवस अतिरिक्त मिळाल्यामुळे मुलांचे अभ्यासावरील लक्ष उडेल. काम उद्यावर ढकलण्याची मानसिकता वाढेल. त्यामुळे निष्काळजीपणा वाढून गुणवत्तेवरही परिणाम होईल. विजयबाविस्कर, पालक

रविवारी सुटीच्या दिवशी मुलांना खेळण्यापासून रोखता येत नाही. मुलेही ते ऐकत नाहीत. यामुळे एक दिवस पुरेसा आहे. अभ्यासक्रमावरही यामुळे परिणाम होईल. सुटीत दिवस जातील. याचा परिणाम परीक्षेवेळी मुलांना जाणवेल. नीलिमाअत्तरदे , पालक

घाईत पूर्ण होईल अभ्यासक्रम
पाचदिवसांच्या आठवड्यात अनेक सणांसह विविध शासकीय सुट्या येतील. यामुळे शाळेच्या दिवसांवरही परिणाम होईल. अभ्यासाचे नियोजन शालेयस्तरावर शिक्षकांकडून कसे तरी पूर्ण केले जाईल. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. हा निर्णय शिक्षकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे शिक्षकांमधून त्यास फारसा विरोध होणार नाही. विद्यार्थ्यांना हा निर्णय दिलासादायक असला तरी, अधिक सुट्यांमुळे पालकांचा ताण वाढण्याची भीती आहे. पाच दिवसांच्या आठवड्यासाठी अनेक शाळांमध्ये पालकांकडून यापूर्वीच मते मागवण्यात आली आहेत. मात्र, बहुतांश पालकांनी यास नकार देत स्थिती पूर्ववत ठेवण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

शाळांना पाच दिवसांच्या आठवड्याबाबत अद्याप कोणताही शासन निर्णय अथवा लेखी सूचना आमच्यापर्यंत आलेल्या नाही. वर्षातील शाळांचे दिवस अभ्यासक्रमाची सांगड घालून तो अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. आदेश आल्यास त्याचे पालन करावे लागेलच. त्या दृष्टीने नियोजन केले जाईल. - तेजराव गाडेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी

बहुतांश आई-वडील कामावर जात असल्याने शक्यतोवर मुलांसाठी रविवारी सुटी घेण्याकडे त्यांचा कल असतो. शनिवारचीही सुटी मिळाली तर मुलांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. शनिवार अर्धा दिवस असला तरी मुले यात अडकून पडतात. सुटीमुळे पालकांचा ताण वाढणार आहे. - वैशाली जगताप, पालक

अंगणवाडी, सीनियर केजीसाठी दोन दिवस सुटी योग्य आहे. मात्र, शिक्षणपद्धतीत अनेक बदल झाल्याने अभ्यासक्रमही वाढला आहे. मुले घरी खेळण्यात अधिक वेळ घालवतात. सुटीमुळे अभ्यासाची दिनचर्या बदलण्याची भीती आहे. सणांसह आठवड्यातून किमान तीन सुट्याही यामुळे मिळतील. - ममता कवडे, पालक