आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरज - रेल्वे प्रवासी ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - यापूर्वी भुसावळातून मुंबईला जाण्यासाठी सकाळी 7 आणि सायंकाळी 5 वाजता पॅसेंजर सुटायची. मात्र, प्रवासीहिताचा कोणताही विचार न करता रेल्वे प्रशासनाने 8 वर्षांपूर्वी सायंकाळी सुटणारी पॅसेंजर बंद केली. याऐवजी भुसावळ-देवळाली शटल सायंकाळी 5.15 वाजता सुरू करण्यात आली. सायंकाळची मुंबई पॅसेंजर बंद झाल्याने हजारो प्रवाशांची अडचण झाली. कारण ही गाडी मुंबई आणि उपनगरांमध्ये स्थिरावलेल्या खान्देशातील चाकरमान्यांना रात्रीच्या प्रवासासाठी सोयीची होती.

दरम्यान, भुसावळमार्गे मुंबईला जाणा-या अनेक जलद गाड्या असल्या तरी बहुतांश स्थानिक प्रवाशांना त्यात जागा मिळत नाही. तिकिटाचे दर पाहता सर्वसामान्य पॅसेंजरला पसंती देतात. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या एकमेव सकाळच्या मुंबई पॅसेंजरमध्ये पाय ठेवायलासुद्धा जागा नसते. ही अडचण सोडवण्यासाठी जिल्ह्यातील खासदारांनी भुसावळातून मुंबईसाठी स्वतंत्र एक्स्प्रेस गाडी सुरू करण्याची मागणी लावून धरली होती. मात्र, त्यांना यश आले नाही. मोदी सरकारने सादर केलेल्या पहिल्या रेल्वे बजेटमध्येसुद्धा जिल्हावासीयांचा अपेक्षाभंग होत मुंबईसाठी स्वतंत्र गाडी मिळाली नाही.

सायंकाळची पॅसेंजर सुटते उशिराने
सकाळच्या पॅसेजरनंतर मुंबईकडे जाण्यासाठी पुन्हा दुस-या दिवसाच्या पॅसेंजरची वाट पाहवी लागते. सायंकाळची भुसावळ-देवळाली शटल ही गाडी कधीही वेळेवर सोडली जात नाही. विलंबाने सुटणारी ही शटल नाशिक रोड स्थानकावर रात्री 12 वाजेनंतर पोहोचते. त्यामुळे प्रवाशांना मनमाड किंवा नाशिकहून मुंबईकडे जाणा-या दुस-या जलद गाड्या मिळत नाहीत. त्यामुळे देवळाली शटल वेळेवर सुटणे गरजेचे आहे.

कसा-याहून लोकलने गाठता येईल मुंबई
मुंबईसाठी भुसावळातून स्वतंत्र एक्स्प्रेस सुरू करण्यात अपयशी ठरलेल्या लोकप्रतिनिधींनी सायंकाळी सुटणारी देवळाली शटल किमान कसारा स्थानकापर्यंत जाईल, असा निर्णय घडवून आणने अपेक्षित आहे. कसारा स्थानकापर्यंत मुंबईकडील लोकल येत असल्याने कल्याण, दादर, ठाणे किंवा थेट शिवाजी छत्रपती टर्मिनन्सपर्यंत जलद प्रवास करता येईल किंवा शटल देवळालीऐवजी पुन्हा मुंबईपर्यंत वाढवल्यास खान्देशातील प्रवाशांची सोय होईल. मात्र, या मागणीचे यशापयश खासदा-यांच्या पाठपुराव्यावंर अवलंबून असेल.
तिन्ही खासदारांनी वापरावे वजन
जळगाव जिल्ह्यात अनुक्रमे रक्षा खडसे, ए.टी.पाटील आणि राज्यसभा सदस्य ईश्वरलाल जैन हे तीन खासदार लाभले आहेत. या तिघांनी हजारो सर्वसामान्य प्रवाशांचे हित लक्षात घेऊन भुसावळातून स्वतंत्र मुंबई एक्स्प्रेस सुरू होईपर्यंत किमान देवळाली शटल कसा-यापर्यंत वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालय व सरकार दरबारी वजन वापरणे अपेक्षित आहे.

जनरल डबे असतात हाऊसफुल्ल
- भुसावळमार्गे मुंबईला जाण्यासाठी अनेक जलद रेल्वे असल्या तरी आरक्षणाचा कोटा मर्यादित आहे. जनरल डब्यात आधीच पाय ठेवायला जागा नसते. त्यामुळे पूर्वीप्रमाणे सायंकाळी पॅसेंजर सुरू करणे किंवा देवळाली शटल कसा-यापर्यंत वाढवावी. राजेश भराडे, उपाध्यक्ष, खान्देश रेल्वे प्रवासी मंच