आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पथेर पांचाली’तून घडवले बंगाली साहित्याचे दर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- दारिद्र्य, दैनेचे जीवन जगत असलेल्या बंगाली ब्राह्मण कुटुंबातील नातेसंबंध दर्शवणाऱ्या साहित्यामध्ये मैलाचा दगड ठरलेल्या ‘पथेर पांचाली’ या कादंबरीच्या अभिवाचनाने जळगावकर रसिक मंत्रमुग्ध झाले. एवढेच नव्हेतर अभिवाचनातून रसिकांना बंगाली साहित्याचे दर्शन घडले.
परिवर्तन संस्थेतर्फे शनिवारी आयएमआर सभागृहात बंगाली भाषेतील प्रसिद्ध कादंबरीकार विभूतीभूषण गंगोपाध्याय यांच्या गाजलेल्या ‘पथेर पांचाली’ या कादंबरीच्या अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास आयएमआरचे प्राचार्य डॉ.विवेक काटदरे, हरीश मिलवाणी, दुर्गादास नेवे, उषा शर्मा हे उपस्थित होती. अभिवाचनाची संकल्पना दिग्दर्शन शंभू पाटील यांचे होते; तर होरिलसिंह राजपूत, प्रतीक्षा जंगम, मंगेश कुलकर्णी, योगेश चौधरी यांनी रंगमंच व्यवस्था तर पार्श्वसंगीत राहुल निंबाळकर यांनी दिले. कार्यक्रमाची निर्मिती पुरुषोत्तम चौधरी हर्षल पाटील यांची होती. प्रा.शमा सुबोध, वसंत गायकवाड, संदीप केदार, योगेश पाटील, योगेश चौधरी, अमरसिंह राजपूत, उदय येशे, सुधाकर पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
जमिनदारी दैन्याचे चित्रण
कादंबरीवर आधारित "पथेर पांचाली' हा सिनेमाही सत्यजित रे यांनी १९५५मध्ये निर्माण केला आहे. बंगालमधील जमिनदारी पद्धत तसेच तेथील दैन्य, दुख या परिस्थितीत एक गरीब ब्राह्मण कुटुंबाच्या झालेल्या वाताहाताची कथा सांगणारी ही कादंबरी आहे. पथेर पांचालीचा अर्थ रस्त्याचे गाणे, असा असून बंगाली साहित्यातील मैलाचा दगड ठरलेल्या या कादंबरीच्या अभिवाचनाने बंगाली साहित्याची ओळख करून दिली.
या कलावंताचा सहभाग

विभूती भूषण गंगोपाध्याय लिखित या सर्वांग सुंदर कादंबरीचे अभिवाचन ही कठीण गोष्ट परिवर्तन संस्थेने आपल्या निर्मितीतून सहज उलगडून दाखवली. या अभिवाचनात अनिल पाटकर, मंजूषा भिडे, नयना पाटकर, मोना तडवी, गायत्री कुलकर्णी, सुदीप्ता सरकार, नारायण बाविस्कर या कलावंतांचा सहभाग हाेता.
बंगाली गीतांनी भरला रंग
कादंबरीच्याआशयाला अनुरूप नेपथ्य, संगीत प्रकाश योजनेचा चपखल उपयोग करून पथेर पांचालीतील दुर्गा, आत्या सुनबाई यासारखे अनेक प्रसंग रसिकांच्या मनाला स्पर्श करून गेले. मूळ बंगाली भाषिक असलेल्या सुदीप्ता सरकार यांच्या गाण्यांनी स्वरांनी अभिवाचनाच्या सादरीकरणात रंगत आणली. गाजलेल्या साहित्याचा नव्या पिढीला परिचय व्हावा तसेच नाट्य, संगीत कलेचा उपयोग करून उत्तमोत्तम साहित्य रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उपक्रमातील एक महत्त्वाचा भाग म्हणून पथेर पांचाली या बंगाली भाषेतील प्रसिद्ध कादंबरीची निवड करण्यात आल्याची माहितीही आयोजकांतर्फे या वेळी देण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...