आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य विद्यापीठात नियुक्त झालेल्या पाटील यांनी देशमुखांना ठेवले अंधारात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - परभणीच्या ‘राष्‍ट्रवादी’ डॉक्टरची उत्तर महाराष्‍ट्र विद्यापीठाकडून झालेली नियुक्ती जळगावकरांच्या जिव्हारी लागली असून ‘आयएमए’सह राजकीय आणि सामाजिक संघटनांनी ही नियुक्ती रद्द करण्याची मागणी थेट राज्यपालांकडे केली आहे. दरम्यान, चाळीसगावचा रहिवास दाखविण्यासाठी ज्यांच्या घराचा पत्ता वापरला गेला त्या जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप देशमुख यांना विचारण्याचे सौजन्यही डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी दाखवलेले नाही, ही बाबही आज स्पष्ट झाली.


आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्त झालेले डॉ. प्रफुल्ल पाटील राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे नेते असून चाळीसगावचे प्रदीप देशमुखही राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचेच आहेत. मात्र, या नियुक्तीसाठी डॉ. पाटील यांनी त्यांच्या घराचा पत्ता देताना त्यांना कल्पनाही दिलेली नाही. शिवाय वकीलीशी काहीही संबंध नसताना प्रदीप देशमुख यांच्या नावासमोर ‘अ‍ॅड.’ अशी अक्षरे जोडून दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात काय पण ‘उमवि’चे कार्यक्षेत्र असलेल्या तिन्ही जिल्ह्यात एकही डॉक्टर आरोग्य विद्यान विद्यापीठाच्या अधिसभेचा सदस्य होण्याच्या लायकीचा सापडू नये, ही बाबही जिल्ह्यातील डॉक्टरांसह सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या जिव्हारी लागली आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटले. इंडियन मेडिकल असोसिएशनने बैठक घेऊन या नियुक्तीचा निषेध केला तर सेनेने जिल्हाधिका-यांना निवेदन दिले. विद्यापीठ विकास मंचनेही ही नियुक्ती रद्द करण्यासाठी राज्यपालांना फॅक्स केला.


पत्ता देताना विचारले नाही
डॉ. पाटील हे राष्‍ट्रवादीचे नेते आहेत हे मी ऐकून आहे; मात्र, त्यांच्याशी माझी थेट ओळख नाही. नाते असण्याचा तर प्रश्नच येत नाही. त्यांनी या नियुक्तीसाठी आमच्या घराचा पत्ता वापरल्याचे मला माहिती नाही. अ‍ॅड.प्रदीप देशमुख, पोस्ट बॉक्स नंबर 10, रांजणगाव दरवाजा, चाळीसगाव हा पत्ता माझाच आहे; पण मी वकील नाही.
प्रदीप देशमुख, संचालक, सहकारी बँक