आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केबीसीप्रमाणे पतसंस्थांच्या घोटाळ्याची चौकशी करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - केबीसी कंपनीने केलेल्या 132 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे केली जात आहे. मात्र, पतसंस्थांमधील 1200 कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यास गृहविभाग टाळाटाळ करत आहे. ठेवीदारांच्या कष्टाच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी गृहविभागाने कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी खान्देश ठेवीदार कृती समितीने केली आहे.

यासंदर्भात ठेवीदारांनी गुरुवारी प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. उपोषणाच्या वेळी पतसंस्थाचालकांच्या निषेधाचे फलक ठेवीदारांनी झळकावले. पालकमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी, उपवर मुलींच्या प्रस्तावावर तत्काळ निर्णय, कलम 83प्रमाणे चौकशी झालेल्या पतसंस्थांवर प्रशासकीय कारवाई, कलम 88 नुसार संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावेत, काळा हनुमान, विठ्ठल रखुमाई, जय मातादी, जनता अर्बन, आनंद अर्बन या पतसंस्थांच्या ठेवीदारांना तत्काळ न्याय मिळावा, आदी मागण्या करण्यात आल्या.

दरम्यान, महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील शुक्रवारी जिल्हा दौ-यावर येत आहेत. ठेवीदार संघटनेतर्फे त्यांना निवेदन दिले जाणार आहे. ठेवीदार संघटनेचे पाच पदाधिकारी पाटील यांची भेट घेणार आहेत. ठेवीदारांनी प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे यांना मागण्यांचे निवेदन दिले. मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला.