आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पीसीपीएनडीटी’चे 19 खटले केले इतरत्र वर्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत दाखल खटल्यामुळे डॉक्टरांच्या मागे लागलेला ससेमिरा लवकरच कमी होणार आहेत. एकाच न्यायालयात दाखल 19 खटल्यांचा निपटारा लवकर करण्यासाठी आता सर्व खटले अन्य न्यायालयांमध्ये वर्ग करण्यात आले आहेत. हे खटले मार्चअखेर निकाली काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

गेल्या वर्षी शासनाने राज्यभरात एकाच आठवड्यात सोनोग्राफी सेंटर व स्त्रीरोगतज्ज्ञांच्या दवाखान्याची तपासणी मोहीम राबवून कायद्याचे उल्लंघन करणार्‍या डॉक्टरांवर कारवाईचा सपाटा लावला होता. त्यात पथकाने गर्भवती महिलांची सोनोग्राफी करताना कागदोपत्री त्रुटी आढळलेल्या डॉक्टरांविरुद्ध महापालिकेच्या माध्यमातून खटले दाखल केले होते. त्यात जळगाव महापालिकेने 19 डॉक्टरांविरुद्ध मुख्य न्यायदंडाधिकारी के.आर.चौधरी यांच्या न्यायालयात खटले दाखल आहेत. त्यात इव्हिडन्स बिफोर चार्जच्या स्थितीत असून या खटल्यातील फिर्यादी असलेल्या अधिकार्‍यांच्या साक्षी नोंदवण्याचे काम सुरू आहे.

व्याप वाढला : मुख्य न्यायादंडाधिकार्‍यांकडे एकाच ठिकाणी 19 खटले दाखल आहेत. त्यात फसवणूक, अब्रुनुकसानी, हाणामारी यासारख्या गुन्ह्यासंदर्भात दाखल खटल्यांचेही काम मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे डॉक्टरांविरुद्धच्या खटल्यांचे कामकाज बर्‍याचदा लांबत होते. त्यात अशा खटल्यांमध्ये साक्षीसाठी अधिकार्‍यांना न्यायालयात दिवसभर थांबून रहावे लागते. एका दिवशी दोन खटल्यांपेक्षा जास्त सुनावणी घेता येत नसल्याने वाढता व्याप लक्षात घेता खटल्यांची विभागणी होणे गरजेचे बोले जात होते.

खटले वर्ग झाले : राज्यभरात पीसीपीएनडीटी खटल्यांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. उच्च न्यायालयानेही महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला डॉक्टरांविरुद्ध गुन्ह्याच्या स्वरूपानुसार कारवाई करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे न्यायालयांमध्ये दाखल खटल्यांचा निपटारा लवकर होण्याची मागणी होती. एकाच ठिकाणी सर्व खटल्यांचे कामकाज सुरू राहिल्यास जादा वेळ लागणार असल्याचे लक्षात घेता आता जळगाव न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी के.आर.चौधरींकडे असलेले 19 खटले अन्य न्यायाधीशांकडे वर्ग करण्यात आले आहेत.