आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकर्सना मिळणार हक्काची जागा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 30 जणांची समिती गठीत करण्यात आली असून, या समितीची पहिली बैठक शुक्रवारी पालिकेत होत आहे.

शहरातील रस्त्यांवर व्यवसाय करून उदरनिर्वाह करणार्‍यांना ‘अतिक्रमणधारक’ मानले जाते. या व्यावसायिकांचाही विचार व्हावा म्हणून ‘राष्ट्रीय फेरीवाला धोरण-2009’ची अंमलबजावणी करण्यासंदर्भात अनेक वर्षांपासून प्रय} सुरू होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने 21 ऑक्टोबर 2013 रोजी पत्रक काढून राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ‘स्थानिक नियोजन प्राधिकरण’ ही शासकीय अधिकार्‍यांची सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.

धोरण निश्चित करण्यासाठी आज बैठक
शहरातील विविध भागात असलेल्या रस्त्यांवरील हॉकर्सची नोंदणी करणे, वर्गवारी करणे, पर्यायी जागा कुठे द्यावी यासंदर्भात धोरण निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी सकाळी 10 वाजता आयुक्त संजय कापडणीस यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण 30 सदस्यांची बैठक पालिकेत आयोजित करण्यात आली आहे. या प्राथमिक बैठकीत हॉकर्ससाठी जागा निश्चित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.

धोरणाच्या फायद्यासाठी वाढली अतिक्रमणे
पालिकेने राष्ट्रीय फेरीवाला धोरणासाठी हालचाली सुरू करताच शहरातील मार्केट परिसरासह मोक्याच्या जागा रातोरात सांभाळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. फुले मार्केट परिसरात दोन-तीन महिन्यांत झपाट्याने अतिक्रमणे वाढली आहेत. अतिक्रमण विभागावर उपमहापौरांनी लाचखोरीचा आरोप केल्यावर काही दिवस रस्ते आणि व्यापारी संकुलेही मोकळी करण्यात आली होती; मात्र दोन महिन्यांत प्रत्यक्षात अतिक्रमण कमी होण्याऐवजी वाढले आहे.

अभ्यासासाठी चार समित्या करणार काम
स्थानिक नियोजन प्राधिकरण समिती : या समितीचे अध्यक्ष पालिका आयुक्त आहेत. तसेच सदस्य म्हणून पोलिस अधीक्षक, सहायक संचालक (नगररचना), महापौर, वाहतूक पोलिस निरीक्षक व पालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांचा समावेश आहे.

फेरीवाला संघटना प्रतिनिधी समिती : या 12 सदस्यीय समितीत नंदू पाटील (महाजन), फारुख गुलाम रसूल अहेलकार, सुनील सोनार, दिनेश हिंगणे, प्रज्ञा जाधव, विशाखा पाटील, सोमनाथ बाविस्कर, मोहन तिवारी, प्रभाकर तायडे, सुलाबाई नवले, सुमन परदेशी, युसूफ रुस्तम यांचा समावेश आहे.

सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी समिती : या समितीत रोटरी क्लबतर्फे अँड.सुरज जहांगीर, अनंत भोळे, लायन्स क्लबतर्फे श्रीराज सिसोदिया, श्रीमती नीलिमा रेदासनी, इनरव्हील क्लबतर्फे डॉ.सीमा पाटील व लॉयन्स रोटरी क्लबर्फे प्रदीप जैन यांचा समावेश आहे.

इतर नागरी संस्था व नागरिकांची समिती : या समितीत सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे, अँड.हेमंत मुदलियार, वास्तुविशारद प्रतिनिधी म्हणून श्यामकांत कुलकर्णी, डी.जे.सोनार, सुचिता कोल्हे व वर्षा चोरडिया यांचा समावेश आहे.