आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेला धावत्‍या रेल्‍वेतून ढकलणा-या टीसीला जनतेची जबर मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- माहेरहून सासरी (इंदूरला) जाणार्‍या विवाहितेचा धावत्या रेल्वेत चढत असताना चाकाखाली आल्याने गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. या घटनेस टीसीला जबाबदार धरत संतप्त झालेल्या मृताच्या नातेवाइकांनी टीसीला मारहाण केली. त्यानंतर टीसीवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी करत पाच तास मृतदेह ताब्यात न घेत पोलिस ठाण्यात संताप व्यक्त केला.
मुक्ताईनगरमधील रहिवासी उज्‍जवला नीलेश पंड्या (वय 35) ही विवाहिता गुरुवारी सकाळी राजेंद्रनगर लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्स्प्रेस गाडीने इंदूरला जात होती. गाडी फलाटावर 5.59 वाजता आली असताना या वेळी गाडी पकडताना उज्‍जवला यांचा तोल गेला. त्यामुळे त्या रेल्वेच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्याचे कळाल्यानंतर प्रवाशांनी चेन ओढून गाडी थांबवली. उज्‍जवला यांना सोडण्यासाठी आलेला त्यांचा भाचा राहुल याने त्यांच्या नातेवाइकांना झालेल्या अपघाताची माहिती दिली. उज्‍जवलाचे वडील महेंद्र पुराणिक, भाऊ राजू पुराणिक पती नीलेश पंड्या यासह परिसरातील नागरिक हे रेल्वे फलाटावर जमा झालेत. त्यांना राहुलने घटनेची माहिती दिल्यानंतर टीसी साळुंके विरुद्धचा संताप वाढत गेला. नागरिकांनी टीसीचा शोध घेत बोगीची तपासणी केली; पण ते नजरेस पडले नाही.
टीसी साळुंके पॅन्ट्री कारमध्ये झोपून
दुर्घटना घडल्यानंतर गाडी थांबवणे, महिलेचा शोध घेणे यापैकी काहीही न करता टीसी संपत साळुंके पॅन्ट्री कारमध्ये आपणास काही माहित नसल्याचा आव आणत झोपून गेला. मात्र, राहुलने त्याला बघितले असल्याने महिलेच्या नातेवाइकांनी जोपर्यंत टीसीला बाहेर काढत नाही, तोपर्यंत गाडी हलू न देण्याचा पावित्रा घेतला. त्यामुळे सुमारे तासभर गाडी फलाटावर उभी होती. सफाई कर्मचार्‍याने सांगितल्यानंतर साळुंकेला बाहेर काढण्यात आले तसेच त्याला आरपीएफच्या कार्यालयात ठेवण्यात आले.
टीसीने आत्याला ढकलले
मी माझ्या आत्याला सोडण्यासाठी आलो होतो. त्या गाडीत चढत असताना टीसी संपत साळुंके दरवाजातून बाजूला होत नव्हते. गाडी चालू झाल्याने गाडीत चढण्याचा आत्यांनी प्रयत्न केला. मात्र, टीसी दरवाजातच उभा असल्याने त्याने धक्का दिला. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन पाय पायरीवरून घसरून त्या रेल्वेखाली पडल्या. टीसीवर कडक कारवाई झाली पाहिजे. राहुल, मृत उज्‍जवला यांचा भाचा नातेवाइकांचा ठिय्या गुन्हा दाखल करण्यासाठी 5 तास साळुंके याला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर जमावाने गोंधळ घातला.
यावेळी बांधकाम व्यावसायिक र्शीकांत खटोड, नगरसेवक सुरेश भोळे हे पोलिस चौकीत थांबून होते. पोलिसांनी रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची सुरुवातीला नोंद केली. त्यावेळी नातेवाइकांनी टीसीवर 304 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरला. अपर पोलिस अधीक्षक एन.अंबिका यांनी तसा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत बच्छाव उपस्थित होते. सकाळी 10.50 वाजता साळुंकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
वडिलांचाही संताप
मुलगी रेल्वेखाली येऊन मृत झाल्याची माहिती मिळाल्याने दु:खी झालेले तिचे वडील महेंद्र पुराणिकही घटनास्थळी आले. त्यांना रेल्वेस्थानकाच्या मोठय़ा जिन्याजवळच नातेवाइकांनी थांबवून ठेवले होते. या घटनेने स्तब्ध झालेले असताना टीसीला मृतदेहाजवळ पोलिस संरक्षणात आणत असताना जमावाकडून मारहाण होत असल्याचे पाहून महेंद्र पुराणिक यांचाही संताप अनावर झाला. त्यांनीही जागेवरून उठून टीसी साळुंकेच्या कानशिलात चारपाच चापटा लगावल्या. मारहाणीत टीसीचा शर्ट पूर्णपणे फाटला.
टीसी छत्रपती पुरस्कारप्राप्त
घटनेत मारहाण झालेले टीसी संपत साळुंके हे छत्रपती शिवाजी क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडू आहेत. कुस्ती या खेळ प्रकारात 1982 ला त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मुलीलाही 2011 ला कबड्डी खेळाचा छत्रपती पुरस्कार मिळाला आहे.