आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहा रुपयांचे नाणे घेतले नाही तर होणार कारवाई, थेट रिझर्व्‍ह बँकेकडे करता येणार तक्रार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दहा रुपयांच्या नाण्यांची संख्या वाढल्याने बाजारात या नाण्यांची चंगळ आहे; पण ही नाणी ग्राहक घेत नसल्यामुळे अनेक वाद निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने आता नाणे घेणाऱ्यांवर कारवाईचे अस्त्र उगारले आहे. त्यामुळे आता व्यापारी अथवा ग्राहकांना थेट रिझर्व्ह बँकेशी संपर्क साधून तक्रार नोंदवता येणार आहे.

 

नोटबंदीनंतर बाजारात १० रुपयांच्या नाण्यांची संख्या वाढली. आजही बँकांकडे नाण्यांचे पाऊच शिल्लक आहेत. यासाठी भारतीय स्टेट बँक नागरिकांना नाणे घेऊन जाण्याचे आवाहन करीत आहे; पण नाण्यांच्या त्रासातून बँकांची सुटका होत नसल्यामुळे बँकेतील अधिकारी वैतागले आहे. दोन वर्षांपूर्वी स्टेट बँकेत चिल्लर येताच ती ग्राहकांना वितरित केली जात होती. मात्र, आज परिस्थिती या उलट आहे. त्यातच १० रुपयांच्या नाण्याचा त्रास वाढला आहे. १० रुपयांचे नाणे बनावट आणि बंद झाल्याची अफवा बाजारात पसरल्यामुळे सहजासहजी नाणे घ्यायला कुणीही तयार नाही. त्यामुळे व्यवहार करताना १० रुपयांच्या नाण्यावरून वाद उद्भवत आहे. त्यामुळे हे नाणे ग्राहक-व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. आजही स्टेट बँकेकडे पाच ते दहा लाखांहून अधिक १० रुपयांच्या नाण्यांचे पाऊच पडून आहेत. याबाबत रिझर्व्ह बँकेकडे आलेल्या तक्रारींची दखल घेत आता १० रुपयांचे नाणे घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत संबधितांनी आरबीआयच्या (०४४) २५३९९२२२ या दूरध्वनीवर तक्रार नोंदवण्याचेही आवाहन केले आहे.

 

दोन हजारची नोट बंद झालेली नाही
नोटबंदीला एक वर्ष होत नाही तोवर दोन हजारांची नोट बंद होणार? अशा अफवा पसरवल्या जात आहे. वास्तविक एटीएम मशीनमध्ये भरायला बँकांकडे दोन हजार रुपयांच्या नोटा कमी पडत आहे. बँकांना अजून नोटांची आवश्यकता आहे. तथापि, दोन हजार रुपयांची नोट बंद होणार याबाबत आम्हाला आरबीआयकडून कुठलेही आदेश नाहीत. - तुषार भोईर, सहायक.महाव्यवस्थापक, स्टेट बँक   

 

नाणे जमा करण्यासाठी बँकेत गर्दी वाढली
महिनाभरापासून स्टेट बँकेत १० रुपयांचे नाणे जमा करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे; पण बँक ही नाणे घेत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांशी वाद होत आहे. जर नाणे बंद झाले नाही तर बँका ते घेत का नाही? असा प्रश्न ग्राहकांकडून विचारला जातो आहे. यावर हे नाणे व्यवहारासाठी असून ती बँकेत जमा करण्यासाठी नाही, असे उत्तर कर्मचाऱ्यांकडून दिले जात आहे. त्यामुळे बँकांमध्ये या नाण्यांवरून डोकेदुखी वाढली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...