आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद पवार यांच्या कुटुंबीयांना मदतीचा ओघ!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- उत्तराखंडमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेल्या शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील शशिकांत पवार यांच्या कुटुंबीयांना निरामय हॉस्पिटल व मित्र परिवारातर्फे दोन लाखांची मदत करण्यात आली आहे. त्याचबरोबर शहीद पवार यांच्या कुटुंबीयांना निरामय हॉस्पिटलमध्ये कायमस्वरूपी मोफत उपचार सेवा देण्यात येणार आहे.

उत्तराखंडमध्ये गेल्या महिन्यात जलप्रलय झाला होता. या भागात अडकलेल्या भाविकांना सोडविण्यासाठी आयटीपीबी, लष्कर, वायुसेनेच्या जवानांना तैनात करण्यात आले होते. बचावकार्य करत असताना गौरीकुंडजवळ एम.आय.-17 हे हेलिकॉप्टर कोसळले होते. त्यामुळे वीस जवान शहीद झाले होते. त्यात धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील शशिकांत पवार यांचा समावेश होता. त्यांच्या कुटुंबीयांची शहरातील निरामय हॉस्पिटलचे डॉ. विपुल बाफना, डॉ. माधुरी बोरसे-बाफना आणि त्यांच्या सहकार्‍यांनी बेटावद येथे जाऊन सांत्वन केले. शहीद शशिकांत पवार यांच्या पत्नी सुवर्णा आणि त्यांचा मुलगा आयुष पवार यांना दोन लाखांची मदत दिली. त्यात निरामय हॉस्पिटलमधील कर्मचारी, डॉक्टरांनी दिलेले एक लाख, मुस्लिम समाजाने दिलेले 40 हजार आणि डॉ. माधुरी बोरसे-बाफना यांच्या एक महिन्याच्या 61 हजार रुपयांच्या वेतनाचा समावेश आहे. या वेळी विजय वाघ, माबूद शेख अब्बास, नीलेश काटे, फकरुद्दीन लोहार, रफिक शाह, चंद्रकांत आघाव, मुख्तार अन्सारी, मनोज भामरे, नूर शेख, राहुल खरात, राजेश चौधरी, एजाज हाजी, भूषण बोरा, महंमद अन्सारी, संजय भडागे, पीर महंमद खलिफा उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांना साकडे
शहीद पवार यांच्या कुटुंबीयास राज्य शासनाने मदत दिलेली नाही. त्यामुळे पवार कुटुंबीयांना तातडीने मदत द्यावी, या मागणीसाठी कॉँग्रेसच्या डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. विपुल बाफना यांनी नुकतेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन दिले. शहीद शशिकांत पवार यांच्या पत्नी सुवर्णा पवार यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.