आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षाचालकाच्या चुकीने प्रौढाचा गेला जीव, प्रवासी मिळवण्याच्या हव्यासापोटी चालकाने थांबवली रिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अचानक रस्त्याच्या कडेला दिसलेले प्रवासी पाहून रिक्षाचालकाने भरधाव वेगात असलेली रिक्षा थांबवल्यामुळे मागून येणारा ट्रक दुचाकीमध्ये समन्वय बिघडला. यामुळे ड्यूटीवरून दुचाकीने घरी परतणाऱ्या प्रौढाला समोरून येणाऱ्या ट्रकने चिरडले. दादावाडी परिसरात महामार्गावर मंगळवारी सकाळी ७.२० वाजता हा अपघात झाला. 
 
प्रमोद एकनाथ पाटील (वय ५९, रा.शिव कॉलनी) हे जैन इरिगेशन कंपनीत नोकरीला होते. ते ड्यूटीवरून खोटेनगरकडून येत असताना गुजराल पेट्रोल पंपाच्या दिशेने एक रिक्षा त्या पाठोपाठ ट्रक त्यांच्या मागे पाटील हे दुचाकीने (एमएच १९ डब्ल्यू ८८३१) येत होते. तीनही वाहने समन्वयाने नियंत्रणात येत होते. याचवेळी दादावाडीजवळ रिक्षाचालकाला त्याच्या रस्त्याकडेला उभे असलेले प्रवासी दिसले. 

रिक्षाचालकाने प्रवासी पाहताच अचानक वेग अत्यंत कमी करून रिक्षा रस्त्याच्याकडेला वळवली. यामुळे मागून येणाऱ्या ट्रकचे देखील संतुलन बिघडले. ट्रकचालकाने अर्जंट ब्रेक दाबले. त्यामुळे सहाजीकच ट्रकच्या मागे दुचाकीवर असलेले पाटील देखील गोंधळले. अशा स्थितीत त्यांनी सेकंदाच्या आतच उजव्या बाजूनेच ट्रकला ओव्हरटेकसाठी दुचाकी उजव्या बाजुने पुढे नेताच समोरून येणाऱ्या दुसऱ्या एका ट्रकने त्यांना दुचाकीसह चिरडले. या अपघातात पाटील यांना जागीच मृत्यू झाला. एकट्या रिक्षाचालकाच्या चुकीमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांचा मुलगा देखील जैन इरिगेशनमध्ये नोकरीला आहे. मंगळवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गणपती विसर्जनाच्या दिवशीच पाटील कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळल्यामुळे शिव कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त केली गेली. 
 
काँग्रेस भवनाजवळ रस्त्यावरच रिक्षांची गर्दी 
काँग्रेसभवन, नेहरू पुतळा, चित्रा चौक, फुले मार्केट येथेही रिक्षांची गर्दी होते. त्यांच्यामुळेच वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र दृष्टीस पडत होते. प्रवाशी मिळवण्यावरून एकमेकांमध्ये चुरस असल्याने इतर वाहनांचा विचार करता मिळेल त्या मार्गाचा चालक प्रयत्न करतात. 
 
अपघात सीसीटीव्ही कैद 
महामार्गालगतएका दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यात महामार्गावर होणाऱ्या हालचालीदेखील कैद होत असतात. पाटील यांचा अपघातदेखील त्यात कैद झाला आहे. रिक्षा, ट्रक पाटील यांची दुचाकी एका रांगेत येत असताना रिक्षाचालकाने अचानक गती कमी केल्यामुळेच हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. सीसीटीव्हीमध्येही हे दृष्य दिसून येत आहे. 
 
एकही वाहन थांबले नाही 
रिक्षाचालकाच्याचुकीमुळे पाटील यांचा अपघात झाला. त्यांना धडक देणारा ट्रक भरधाव वेगात खोटेनगरच्या दिशेने निघून गेला. समोर असलेला दुसरा ट्रक रिक्षाचालकानेदेखील घटनास्थळावरून पळ काढला, तर पाटील यांच्या मागून येणारा एक ट्रक अपघातग्रस्त दुचाकी पाटील यांच्या मृतदेहाच्या दोन फूट अंतरावर येऊन थांबला होता. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...